"चिन्नम्मां'च्या बडदास्तीवर आक्षेप घेणाऱ्याची बदली

वृत्तसंस्था
मंगळवार, 18 जुलै 2017

बंगळूर : बेहिशेबी मालमत्ताप्रकरणी तुरुंगवास भोगत असलेल्या अण्णा द्रमुकच्या नेत्या शशिकला ऊर्फ चिन्नम्मा यांना दिल्या जाणाऱ्या विशेष वागणुकीविरोधात आवाज उठविणाऱ्या पोलिस उपमहानिरीक्षक डी. रूपा यांची आज तातडीने बदली करण्यात आली. तसेच, या प्रकरणावरून रूपा यांच्याबरोबर जाहीररीत्या वाद घालणारे तुरुंग महासंचालक एच. एन. सत्यनारायण राव यांचीही बदली करण्यात आली आहे.

कर्नाटक सरकारने आज परिपत्रक काढत ही घोषणा केली आहे. राव यांना अद्याप दुसरे पद देण्यात आलेले नाही, तर रूपा यांना वाहतूक शाखेची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. डी. रूपा यांनी गेल्या आठवड्यात राव यांना एक अहवाल सादर केला होता. यामध्ये त्यांनी, शशिकला यांना विशेष वागणूक देण्यासाठी दोन कोटी रुपयांचा व्यवहार झाल्याची "चर्चा' असल्याचे सांगितले. तसेच, राव यांच्याविरोधातही आरोप होत असल्याचे सांगितले. तुरुंग नियमांचा भंग करून शशिकला यांच्यासाठी वेगळा स्वयंपाक होत असल्याचाही त्यांनी आरोप केला. शशिकला या परप्पना अग्रहार मध्यवर्ती तुरुंगात चार वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा भोगत आहेत. राव यांनी आपल्याविरोधातील सर्व आरोप चुकीचे आणि आधारहीन असल्याचे सांगत नाकारले. तसेच, रूपा यांच्याविरोधात कायदेशीर कारवाई करण्याचाही इशारा दिला. रूपा यांनीही त्यांना चौकशीचे आव्हान दिले. या दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांमध्ये हा वाद जाहीररीत्या सुरू असतानाच मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी याप्रकरणी उच्चस्तरीय चौकशीचे आदेश दिले आहेत. रूपा यांच्या अहवालामुळे मोठा वाद निर्माण झाल्याने चिडलेल्या सरकारने त्यांनाही नोटीस बजावत नियमभंगाबाबत विचारणा केली आहे. मुद्रांक गैरव्यवहारातील सूत्रधार अब्दुल करीम तेलगी यालाही तुरुंगात विशेष वागणूक मिळत असल्याचा अहवाल दिल्याने डी. रूपा पूर्वी चर्चेत आल्या होत्या.

रुपा यांच्या बदलीबाबत विरोधकांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली आहे. रुपा यांना प्रामाणिकपणाबद्दल मिळालेली ही शिक्षा असल्याचे भाजपने म्हटले आहे. सिद्धरामय्या यांनी मात्र या निर्णयाचे समर्थन केले आहे. दोन्ही अधिकाऱ्यांनी नियमांचा भंग केल्यानेच त्यांची बदली केल्याचे त्यांनी सांगितले.