गौरी लंकेशप्रकरणी एसआयटीकडे महत्त्वाची माहिती

वृत्तसंस्था
सोमवार, 2 ऑक्टोबर 2017

बंगळूर: वरिष्ठ कन्नड पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्येप्रकरणी विशेष तपास पथकाच्या (एसआयटी) हाती महत्त्वाची माहिती मिळाली असल्याचे कर्नाटकचे गृहमंत्री रामलिंग रेड्डी यांनी सांगितले. त्याचप्रमाणे आणखी पुरावे मिळविण्याचे प्रयत्न सुरू आहेत. गौरी लंकेश यांनी प्रस्थापित उजव्या विचारसरणीच्या विरोधात आवाज उठविला होता. त्यांची अज्ञात हल्लेखोरांनी पाच सप्टेंबर रोजी रात्री घराबाहेर गोळ्या घालून हत्या केली होती.

या हत्येप्रकरणी काही महत्त्वाचे धागेदोरे आमच्या हाती लागले असले तरी आम्ही ते प्रसारमाध्यमांना सांगणार नाही. कारण, या महत्त्वाच्या धागेदोऱ्याविरोधात आम्हाला योग्य तो पुरावा हाती मिळाला पाहिजे, असे त्यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. योग्य पुरावे आमच्याकडे नसताना आम्ही न्यायालयात आरोपपत्र दाखल केले तरी ते तेथे नीट मांडता येणार नाही. आमचे विशेष तपास पथक पुरावे गोळा करण्याचा प्रयत्न करीत आहे. विशेष तपास पथकाला या प्रकरणात नऊ सप्टेंबरला काही महत्त्वाचे धागेदोरे मिळाले असल्याचा दावा या मंत्र्याने केला आहे. लंकेश यांच्या हत्येप्रकरणी लवकरच आरोपीला अटक केली जाईल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. कर्नाटक सरकारने बी. के. सिंह यांच्या नेतृत्वाखाली विशेष तपास पथकाची नेमणूक केली असून, लंकेश यांची हत्या करणाऱ्याची माहिती देणाऱ्यास दहा लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले आहे.