बॅंकांमुळे नोटाबंदीचा अपेक्षित लाभ नागरिकांना नाही : नितीशकुमार 

वृत्तसंस्था
सोमवार, 28 मे 2018

विरोधी पक्षात असूनही नोटाबंदीच्या निर्णयाचे समर्थन करणारे बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी आता नोटाबंदीच्या निर्णयावर प्रश्‍न उपस्थित केले आहेत. शनिवारी आयोजित एका कार्यक्रमात नितीशकुमार यांनी बॅंकांच्या धोरणामुळे नोटाबंदीचा अपेक्षित लाभ नागरिकांना मिळू शकला नसल्याचे म्हटले आहे. 

पाटणा - विरोधी पक्षात असूनही नोटाबंदीच्या निर्णयाचे समर्थन करणारे बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी आता नोटाबंदीच्या निर्णयावर प्रश्‍न उपस्थित केले आहेत. शनिवारी आयोजित एका कार्यक्रमात नितीशकुमार यांनी बॅंकांच्या धोरणामुळे नोटाबंदीचा अपेक्षित लाभ नागरिकांना मिळू शकला नसल्याचे म्हटले आहे. 

राज्यस्तरीय बॅंकर्स समितीतर्फे आयोजित 64 व्या तिमाही आढावा बैठकीत ते बोलत होते. नितीशकुमार म्हणाले, की देशाच्या विकासात बॅंकांचा मोलाचा वाटा आहे. बॅंकांचे धोरण केवळ व्यवहार, कर्जवाटप करणे यापुरतीच मर्यादित नसून सरकारच्या प्रत्येक योजनेत बॅंकाचा सहभाग वाढणे गरजेचे आहे. देशाच्या विकासासाठी सरकार जो निधी प्रदान करते, त्याचे योग्यरीतीने वाटप करण्यासाठी बॅंकांना आपली कार्यप्रणाली सक्षम करणे गरजेचे आहे. बॅंक स्वायत्त आहेत. वरच्या स्तरापासून ते तळागळापर्यंत सक्षमीकरण करण्याची तयारी करायला हवी, असे नितीशकुमार म्हणाले. दरम्यान, नोटाबंदीच्या निर्णयाच्या वेळी नितीशकुमार हे एनडीएत सहभागी झालेले नव्हते. तरीही त्यांनी या निर्णयाचे स्वागत केले आणि पाठिंबा दिला होता. मात्र आज नितीशकुमार एनडीएचे सदस्य असताना या निर्णयावर प्रश्‍न उपस्थित करत आहेत.

Web Title: Banks deprived people of note ban benefits says Nitish Kumar