ban-note
ban-note

पगाराच्या दिवशी बँका 'कॅशलेस' 

नवी दिल्ली - केंद्र सरकारच्या नोटाबंदीच्या निर्णयास 23 दिवस उलटले असतानाही देशातील चलन टंचाई अद्याप संपलेली दिसत नाही. सामान्य माणसांच्या बॅंका आणि "एटीएम'समोरील रांगा अद्याप कमी झालेल्या नसून आज पुन्हा त्यात पगारी नोकरदारांची भर पडली. अनेक राज्यांमध्ये सकाळीच सर्व "एटीएम' मशीनमध्ये खडखडाट झाल्याने नागरिकांचा हिरमोड झाला. ज्या बॅंकांकडे पुरेशा प्रमाणात निधी उपलब्ध आहे, त्यांनी आज प्रतिमाणशी दहा हजार रुपये दिले तर काही बॅंकांनी पाच आणि दोन हजारांमध्येच ग्राहकांची बोळवण केली. देशभरातील 80 टक्के "एटीएम' मशीनमध्ये दुरूस्त होऊनदेखील लोकांना चलन टंचाईला सामोरे जावे लागत आहे. 

मुंबई, दिल्ली, कोलकता आणि बंगळूर या शहरांमध्येही आज चलनटंचाईमुळे नागरिकांची चांगलीच धावाधाव झाली. दिल्लीमध्येही सकाळीच सर्व "एटीएम' मशीन अल्पावधीत रिकामे झाल्याने नागरिकांना धावपळ करावी लागली. देशात सर्वदूर लवकर नवे चलन पोचावे म्हणून सरकारनेही कंबर कसली असून, हवाई दलाचे प्रमुख अरूप राहा यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन त्यांना चलनवाहतुकीबाबत माहिती दिली. नव्या चलनी नोटा देशभर पोचविण्यासाठी आम्ही गरजेनुसार आणखी विमाने उपलब्ध करून देणार आहोत, असे राहा यांनी संसदेच्या कॉम्पलेक्‍समध्ये पत्रकारांशी बोलताना सांगितले. सध्या भारतीय हवाई दलाची बारा विमाने देशभर नोटा पोचविण्याचे काम करत असून, यामध्ये "सी-17 ग्लोबमास्टर'सारख्या बड्या विमानाचाही समावेश आहे. आतापर्यंत देशातील विविध भागांमध्ये विमानांच्या माध्यमातून 165 टन नोटा पोचविण्यात आल्या आहेत. 

दिवसभरात 

मुंबईत बॅंकांसमोर नोकरदार, पेन्शनधारकांच्या रांगा 

केरळमध्ये अनेक भागांत दुपारपर्यंत रोकडच पोचली नाही 

दिल्लीमध्येही बॅंका "एटीएम'मधील रोकड संपली 

अनेक ठिकाणी बॅंक कर्मचारी आणि लोकांत बाचाबाची 

अनेक बॅंक कर्मचाऱ्यांनी मागितले पोलिस संरक्षण 

त्रिपुरात लोकांनी सगळेच पैसे काढल्याने "एटीएम' रिकामे 

तेलंगण, आंध्रात सकाळी सहापासूनच बॅंकांसमोर रांगा 

सध्या "एटीएम'मध्ये चलनाचा मोठ्याप्रमाणावर तुटवडा असून, 20 दशलक्ष लोकांना आम्हाला वेतन द्यायचे असताना आमच्याकडे केवळ 25 टक्केच रक्कम जमा झाली आहे. अनेक ठिकाणांवर बॅंकांच्या सुरक्षेचा प्रश्‍न ऐरणीवर आला आहे. 

सी. एच. व्यंकटचलम, सरचिटणीस, "ऑल इंडिया बॅंक एम्प्लॉइज असोसिएशन' 

नोटांची वेगाने छपाई 

देशातील चारही सरकारी छापखान्यांमध्ये नोटा छपाईचा वेग वाढविण्यात आला असून, त्यांचे काम आता तीन शिफ्टमध्ये सुरू आहे. बॅंकांना केला जाणाऱ्या चलन पुरवठ्यामध्येही "रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडिया'ने चारपटीने वाढ केल्याची माहिती सूत्रांनी दिली. नव्याने मुद्रित करण्यात आलेल्या पाचशे रुपयांच्या नोटा चलनात आल्यानंतर सर्व व्यवहार सुरळीत होतील, असे काही बॅंक अधिकाऱ्यांना वाटते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com