बेळगावचे ठाणेदार अमेरिकेत निवडणूक लढविणार

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 11 जून 2017

"ही श्रींची इच्छा' या बेस्ट सेलर पुस्तकाचे लेखक, उद्योजक आणि बेळगावचे सुपुत्र श्रीनिवास ठाणेदार आता अमेरीकेतील निवडणुकीत नशीब आजमावणार आहेत. गेले अनेक वर्षे अमेरिकेत असलेल्या ठाणेदार यांनी मिशिगन राज्याच्या राज्यपालपदाची निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला आहे.

बेळगाव - "ही श्रींची इच्छा' या बेस्ट सेलर पुस्तकाचे लेखक, उद्योजक आणि बेळगावचे सुपुत्र श्रीनिवास ठाणेदार आता अमेरीकेतील निवडणुकीत नशीब आजमावणार आहेत. गेले अनेक वर्षे अमेरिकेत असलेल्या ठाणेदार यांनी मिशिगन राज्याच्या राज्यपालपदाची निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला आहे.

मूळ बेळगावचे असलेले ठाणेदार यांनी मुंबई विद्यापीठातून पदवी संपादन केल्यानंतर अक्रॉन विद्यापीठातून पॉलिमर केमेस्ट्रिमध्ये पदवी मिळविण्यासाठी अमेरिकेला गेले. त्यानंतर तेथेच स्थायिक झाले. विविध संस्थांत काम करताना त्यांनी 1990 मध्ये श्रीमीर नावाची कंपनी सुरू केली. त्यानंतर ते यशस्वी उद्योजक म्हणून नावारूपास आले. त्यांनी आपली वाटचाल "ही श्रींची इच्छा' या पुस्तकात सविस्तरपणे विषद केली आहे. हे पुस्तक साहित्य क्षेत्रात बेस्ट सेलर म्हणून गणले जाते. उद्योग आणि साहित्य क्षेत्रात उल्लेखनिय कामगिरी केल्यानंतर ठाणेदार आता राजकारणाकडे वळले आहेत.

ठाणेदार यांनी अमेरिकेतील मिशिगन राज्याच्या राज्यपालपदाची निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला आहे. ही निवडणूक पुढील वर्षी होणार आहे. डेट्रॉइट येथे झालेल्या एका कार्यक्रमात त्यांनी हा मनोदय जाहीर केला. मिशिगनमध्ये राजकीय कुरघोड्या, पक्षपात आदी गैरप्रकार बोकाळले असून नागरिक त्यास कंटाळले आहेत. मिशिगनमधील सरकार हे ठराविक लोकांसाठी काम करीत असून बहुसंख्यांकडे त्यांचे दुर्लक्ष होत आहे. हे बदलण्यासाठी मी ही निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला आहे, असे ते म्हणाले. अनेकांनी आजवर केलेल्या मदतीची परतफेड करण्याची वेळ आली असून राज्यपाल या नात्याने मी सर्वांना न्याय देऊ शकेन, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.