सीमालढ्यात खानापूरकरांचेही मोठे योगदान

सीमालढ्यात खानापूरकरांचेही मोठे योगदान

खानापूर -  तालुक्‍यात बहुसंख्यने मराठी भाषिक आहेत. १ नोव्हेंबर १९५६ पासून मराठीबहुल भाग कर्नाटकात डांबल्यापासून महालक्ष्मी मंदिरात महाराष्ट्रातील महनीय नेत्यांना बोलावून जाहीर सभा घेतली जाते. चार वर्षांपासून शिवस्मारकामध्ये काळ्या दिनानिमित्त लाक्षणिक उपोषणाचे आयोजन करण्यात येत आहे. त्यामध्ये हजारो कार्यकर्ते हाताला काळ्या फिती बांधून सहभाग दर्शवितात.

सीमाप्रश्‍न सुटावा म्हणून समितीच्या कार्यकर्त्यांनी पायात चपला न घालणे, दिवाळीत आरती न करवून घेणे, दाढी मिशा न कापणे असे वैयक्तिक पण केले आहेत. अशा व्यक्तींसह अनेकांनी आपल्या हयातीत सीमाप्रश्‍न सुटावा म्हणून समितीचा आमदार निवडून आणण्यासाठी पदरमोड केली. 

खानापूर तालुक्‍यात सीमालढा तीव्र करण्यासाठी निळकंठराव देसाई, विद्याधर नरगुंदकर, नाना पाटील, दशरथ गिरी, नाना दलाल, बिर्जे गुरुजी, निंगाप्पा घाडी यांनी कार्यकर्त्याची फळी उभारली. हलगा गावचे मष्णू पाटील व मेंढेगाळीचे गोपाळ पाटील यांनी सीमाप्रश्‍न सुटेपर्यंत अंगात शर्ट न घालण्याचा निर्णय घेतला. १९८३ मध्ये माजी आमदार व्ही. वाय. चव्हाण यांनी आत्मदहनाचा निर्णय घेतला. माजी केंद्रीय मंत्री व राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष शरद पवार, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी पत्रव्यवहार करून त्यांना आत्मदहनाचा निर्णय मागे घेण्यास लावला. त्यानंतर १९८५ मध्ये एस. एम. जोशी यांच्या अध्यक्षतेखाली संयुक्त महाराष्ट्र सीमा समिती स्थापन झाली. सचिव म्हणून मधु दंडवते यांची निवड झाली. 

१९८६ मध्ये कन्नडसक्ती विरोधातील आंदोलनात खानापूरकर उत्फूर्तपणे सहभागी झाले. १९८९ मध्ये व्ही. वाय. चव्हाण आमदार झाल्यानंतर तीन वर्षात सीमाप्रश्‍न सुटला नाही तर, आत्मदहन करण्याचे जाहीर केले. १९८३ मध्ये सध्याच्या शिवस्मारक चौकात आत्मदहनाचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. महिलांनीही आंदोलनात सहभाग दर्शविला होता. आमदार डी. एस. खांडेकरांच्या नेतृत्वाखाली दिनेशचंद्र गायकवाड, शंकरराव कुंभार, आनंदराव सागावकर, दत्तात्रय सुतार यांनी भाग घेतला. जोतिबा सुर्वे यांच्या नेतृत्वाखाली नाना पाटील, चन्नाप्पा कुंभार, धोंडिबा कुंभार यांनी तसेच गर्लगुंजीत अनंत देसाई, शिवानंद जोशी, नामदेव नाळकर, विष्णू घाडी, मधुकर जोशी, शंकर करंबळकर यांनी आंदोलन केले. या लढ्यात तालुक्‍यातील अठरा पगड जातीतील लोकांनी सहभाग घेतला आहे. 

सीमाप्रश्‍न सुटल्यानंतरच आरती
खानापूर तालुक्‍यातील जळगे गावात १९७० पासून सीमाप्रश्‍न सुटल्याशिवाय दिवाळीची आरती करून घेणार नाही असा निर्णय ग्रामस्थांनी घेतला आहे. आजपर्यंत तेथे दिवाळीत आरती केली जात नाही. रस्त्यावरची लढाई लढत असताना २००४ मध्ये सीमावाद न्यायालयात गेला. महाराष्ट्र सरकारसह सीमावासीय आपली बाजू ठामपणे मांडत आहेत. त्यासाठी हजारो पानी पुरावा म्हणून कागदपत्रांची पूर्तता केली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com