हॉटेलच्या १७०० खोल्या कर्नाटक अधिवेशनासाठी बुक - झियाउल्ला एस.

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 9 नोव्हेंबर 2017

बेळगाव - विधिमंडळ अधिवेशनासाठी बेळगावात येणारे मंत्री, आमदार आणि अधिकाऱ्यांच्या राहण्याची व्यवस्था शहर आणि उपनगरातील हॉटेल्समध्ये करण्यात आली आहे. त्यासाठी एकूण १,७०० खोल्या बुक केल्या आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी झियाउल्ला एस. यांनी दिली.

बेळगाव - विधिमंडळ अधिवेशनासाठी बेळगावात येणारे मंत्री, आमदार आणि अधिकाऱ्यांच्या राहण्याची व्यवस्था शहर आणि उपनगरातील हॉटेल्समध्ये करण्यात आली आहे. त्यासाठी एकूण १,७०० खोल्या बुक केल्या आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी झियाउल्ला एस. यांनी दिली.

मंत्री, आमदार आणि अधिकारी तारांकित व नामांकित हॉटेल्समध्ये राहणार आहेत. यासाठी हॉटेल्समधील स्वच्छता, शुद्ध पाणीपुरवठा व शहरातील रस्त्यांची दुरुस्ती करून त्याचा अहवाल सादर करण्याच्या सूचना महापालिकेला केल्या आहेत. वरिष्ठ आणि कनिष्ठ मिळून चार हजार अधिकारी अधिवेशनासाठी बेळगावात दाखल होणार आहेत. तसेच सर्व मंत्रिमंडळ, आमदार, विधान परिषद सदस्यही शहरात येणार आहेत. मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या निवासाची व्यवस्था शासकीय विश्रामगृहात केली आहे. शहरातील जवळपास सर्व हॉटेल्समधील खोल्या आरक्षित केल्या असून तिथे निवास, अल्पोपाहार व जेवणाची व्यवस्था केली जात आहे, अशी माहिती त्यांनी दिली.

हिवाळी अधिवेशन १३ नोव्हेबरपासून सुरू होणार आहे. त्याची पूर्वतयारी बैठक घेऊन अधिकाऱ्यांवर जबाबदारी सोपविली आहे. सभापतींनी बेळगाव तसेच बंगळूरमध्ये बैठक घेऊन निवास, भोजन व वाहन व्यवस्थेचा आढावा घेतला आहे. तसेच त्यांनी यंदाच्या अधिवेशनासाठी सुरक्षा व्यवस्था अधिक कडक करण्याच्या सूचना दिल्या आहेत. विशेषतः आंदोलकांची माहिती, त्यांच्यासाठी निश्‍चित केलेले ठिकाण व पोलिस सुरक्षा व्यवस्था आदींबाबत दक्षता घेण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यानुसार पोलिस अधिकाऱ्यांशी चर्चा केली आहे. अधिवेशनासाठी सुमारे चार ते पाच कोटी रुपयांचा निधी खर्च येणार आहे, असे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.