बेळगावात २२ पासून हेल्मेटसक्ती

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 16 जानेवारी 2018

बेळगाव - येत्या २२ जानेवारीपासून हेल्मेटसक्ती करण्याचा निर्धार पोलिस आयुक्तालयाने केला असून, सोमवारी (ता. १५) तसा अधिकृत आदेश बजावला. आणखी आठवडाभर जागृती व त्यानंतर दंडात्मक कारवाईला सुरवात होईल, असे आदेशात म्हटले आहे.

बेळगाव - येत्या २२ जानेवारीपासून हेल्मेटसक्ती करण्याचा निर्धार पोलिस आयुक्तालयाने केला असून, सोमवारी (ता. १५) तसा अधिकृत आदेश बजावला. आणखी आठवडाभर जागृती व त्यानंतर दंडात्मक कारवाईला सुरवात होईल, असे आदेशात म्हटले आहे. आयएसआय प्रमाणित हेल्मेटच वापरण्याचा दंडक असल्यामुळे प्रत्येक दुचाकीस्वाराला आता दर्जेदार हेल्मेटच खरेदी करावे लागणार आहे.

११ जानेवारीला आयुक्तालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेत पोलिस आयुक्त डॉ. डी. सी. राजप्पा यांनी हेल्मेटसक्तीचे संकेत दिले होते. त्यानंतर आज त्यांनी अधिकृत पत्रक प्रसिद्ध केले. त्यामुळे येत्या सोमवारपासून शहरात हेल्मेसक्तीला प्रारंभ होणार आहे.

हेल्मेटसक्तीसाठी आठवडाभर शहरातील जनतेतून जागृती कार्यक्रम घेण्यात येणार असल्याचे वाहतूक एसीपी महांतय्या मुप्पीनमठ यांनी ‘सकाळ’ला सांगितले. हेल्मेट सर्वांना सक्तीचे आहे हे दर्शविण्यासाठी येत्या दोन दिवसांत शहरातून हेल्मेट परिधान केलेल्या पोलिसांची दुचाकी फेरी काढली जाणार आहे. यानंतर शहरातील सर्व हायस्कूल व कॉलेजच्या क्रीडा शिक्षकांना बोलावून त्यांच्यामध्ये जागृती केली जाईल. शिवाय वाहतूक पोलिस अधिकारी स्वतः काही शाळा व कॉलेजीसना भेट देऊन विद्यार्थ्यांत जागृती करणार आहेत. त्यांना वाहतूक नियमांचे तसेच सिग्नलचे महत्त्व पटवून दिले जाईल. दुचाकीस्वारांमध्ये जागृती व्हावी, यासाठी प्रत्येक चौकात पोलिस अधिकारी, पोलिस व शालेय विद्यार्थी थांबून जागृती करतील. वाहनधारकांना गुलाबपुष्प देऊन त्यांना हेल्मेटचे महत्त्व पटवून दिले जाणार आहे.

दुचाकीस्वार रस्त्यावर कोसळला किंवा एखाद्या वाहनाला जाऊन धडकला तर त्याच्या डोक्‍याला मार लागून मृत्यू येण्याची शक्‍यता अधिक असते. टोपीसारखे व साधे हेल्मेट डोकीवर असूनही ते जीव वाचविण्यात उपयुक्त ठरेल, हे सांगता येत नाही. त्यामुळेच आयएसआय प्रमाणित हेल्मेटची सक्ती केलेली आहे. त्यासाठी प्रत्येकाने दर्जेदार कंपनीचे हेल्मेट खरेदी करण्याची गरज आहे.
- महांतय्या मुप्पीनमठ, 

एसीपी, वाहतूक विभाग 

प्रमाणित हेल्मेटची सक्ती 
याआधी रस्त्याच्या बाजूला मिळणाऱ्या साध्या हेल्मेटऐवजी आयएसआय प्रमाणित हेल्मेट, ते देखील दोन्ही कान व चेहरा झाकला जाईल, अशा पद्धतीचे असावे, याची सक्ती राहणार आहे. त्यामुळे ज्यांच्याकडे जुने हेल्मेट आहे; परंतु ते आयएसआय प्रमाणित नाही, त्यांना नव्याने हेल्मेट खरेदी करावे लागणार आहे. यामधून पोलिस अधिकारी, पोलिस किंवा कोणत्याही सरकारी अधिकाऱ्याची सुटका नाही. त्यामुळे सामान्यांनीही प्रमाणित हेल्मेट खरेदी करावे, असे आवाहन पोलिस खात्याने केले आहे. 

सध्या तरी फक्त दुचाकीचालकाला सक्ती
‘दुचाकीस्वार व पाठीमागे बसलेला अशा दोघांनाही हेल्मेटसक्ती’ असा सर्वोच्च न्यायालयाच्या आदेश आहे. परंतु, जेथे दुचाकीचालकच हेल्मेट वापरण्यास टाळाटाळ करतो, तेथे पाठीमागे बसलेला हेल्मेट घालत नाही याची पोलिस खात्यालाही याआधीच्या अनुभवावरून कल्पना आहे. त्यामुळे सध्या तरी दुचाकीचालकाला हेल्मेटसक्ती करण्यात आली आहे, असे पोलिस सूत्रांनी सांगितले.

हेल्मेट दरात दीडशे ते चारशेची वाढ

बेळगाव शहरात २२ जानेवारीपासून हेल्मेटसक्‍ती लागू होणार असल्याने, तसेच ‘आयएसआय’ मार्कचे बंधन घातल्याने काही विक्रेत्यांनी अचानक हेल्मेट दरात वाढ केली आहे. त्यामुळे दुचाकीधारकांच्या खिशाला कात्री लागत आहे. काही दिवसांपूर्वी ६५० ते १००० हजार रुपये दराने विक्री करण्यात येत असलेले आयएसआय मार्क हेल्मेट आता ८०० ते १३४० रुपये दराने विक्री केले जात आहे. 

सोमवार (ता. २२)पासून शहरात हेल्मेटसक्‍ती लागू केली आहे. या आदेशाचे दुचाकीचालकांनी पालन करावे; अन्यथा विना हेल्मेट वाहनचालकांवर दंडात्मक कारवाई करण्यात येईल. तसेच हेल्मेटवर आयएसआय मार्क असणे गरजेचे आहे.
- डॉ. डी. सी. राजप्पा,
पोलिस आयुक्‍त, बेळगाव

Web Title: Belgaum News Helmet compulsion