उमेदवारी यादीवर सिद्धरामय्यांचाच प्रभाव

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 19 एप्रिल 2018

बंगळूर - विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने जाहीर केलेल्या उमेदवारी यादीवर मुख्यमंत्री सिध्दरामय्या यांचा प्रभाव दिसून येतो. आपल्या जास्तीतजास्त समर्थकांना उमेदवारी मिळवून देण्यात ते यशस्वी ठरले आहेत. पक्षावरील त्यांची पकड आता अधिक मजबूत झाली असून पक्ष सत्तेवर आल्यास त्यांच्या मुख्यमंत्रिपदाच्या दाव्याला बळकटी मिळणार आहे.

बंगळूर - विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने जाहीर केलेल्या उमेदवारी यादीवर मुख्यमंत्री सिध्दरामय्या यांचा प्रभाव दिसून येतो. आपल्या जास्तीतजास्त समर्थकांना उमेदवारी मिळवून देण्यात ते यशस्वी ठरले आहेत. पक्षावरील त्यांची पकड आता अधिक मजबूत झाली असून पक्ष सत्तेवर आल्यास त्यांच्या मुख्यमंत्रिपदाच्या दाव्याला बळकटी मिळणार आहे.

मल्लिकार्जुन खर्गे, डॉ. जी. परमेश्वर यांनी सिद्धरामय्यांच्या समर्थकांच्या यादीला जोरदार विरोध केला होता. परंतु, आपली चाणक्‍यनीति अवलंबून त्यांनी त्यांच्यावर मात केली आहे. रविवारी (ता. १५) काँग्रेस श्रेष्ठींनी २१८ उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. परंतु, यादी पाहिल्यानंतर सिध्दरामय्यांनी आपल्या समर्थक उमेदवारांना प्राधान्य दिल्याचे दिसून येते. सध्याची निवडणूक सिद्धरामय्यांच्या नेतृत्वाखाली लढविण्यात येणार असल्याचे काँग्रेस श्रेष्ठींनी लेखी स्वरुपात स्पष्ट केले आहे. 

बहुतेक नेते आपले व आपल्या कुटुंबीयांचे हित साधण्यापुरतेच मर्यादित राहीले. आपल्या समर्थकांचे हित जपण्यात ते अयशस्वी ठरले आहेत. प्रचार समितीचे अध्यक्ष डी. के. शिवकुमार यांनीही समर्थक आमदारांना प्राधान्य देण्यात आले आहे. धजदमधून आलेल्या सर्व सातही आमदारांना काँग्रेसचे तिकीट मिळवून देण्यात सिध्दरामय्या यशस्वी झाले आहेत. त्यामुळे, त्यांचाही विश्वास सिद्धरामय्यांनी मिळविला. शिवाय वादग्रस्त ठरलेले नाईस संस्थेचे प्रमुख अशोक खेणी, बळ्ळारीचे आनंदसिंग, बी. नागेंद्र यांना उमेदवारी मिळवून देण्यात त्यांना यश आले आहे.

आपला मुलगा यतिंद्र यांना वरुणा मतदारसंघातून तर आपले आप्तेष्ट जयचंद्र यांचे पुत्र संतोष जयचंद्र यांना चिक्कनायकनहळ्ळी, रामलिंगा रेड्डी यांचे पुत्र सौम्य रेड्डी यांना जयनगरमधून उमेदवारी मिळवून दिली आहे. निकटचे मंत्री एच. एम. रेवण्णा यांनाही त्यांनी चन्नपट्टणमधून उमेदवारी दिली आहे. काँग्रेसमध्ये तीव्र विरोध असतानाही होळेनरसिंहपूर मतदारसंघातून मंजेगौडा यांना उमेदवारी मिळवून दिली.

डी. के, शिवकुमार यांनी आपले समर्थक एनएसयुआयचे अध्यक्ष मंजुनाथ, माजी महापौर पद्मावती, एच. डी. रंगनाथ व एम. बोरेगौडांना उमेदवारी मिळवून दिली. माजी मुख्यमंत्री वीरप्पा मोईलींनी आपले समर्थक व्यंकटस्वामी यांना देवनहळ्ळीतून व कार्कळमधून गोपाळ भंडारी यांना उमेदवारी मिळवून दिली आहे. प्रदेशाध्यक्ष जी. परमेश्वर हे कोरटगेरे व इतर कांही मतदारसंघात आपल्या समर्थकांना उमेदवारी मिळवून देण्यात अपयशी ठरले.

खासदार के. एच. मुनीयप्पा यांनी आपल्या कन्येस उमेदवारी मिळवून देण्याच्या प्रयत्नात बहुतेक समर्थकांना नाराज केले आहे. जाफर शरिफ यांचाही प्रभाव यावेळी विशेष कामी आला नाही. त्यामुळे सिध्दरामय्या वरचढ ठरले. 

सिध्दरामय्या व शिवकुमार या जोडीने परस्पर समझोता करून उमेदवारीत अधिकाधिक वाटा पदरात पाडून घेतला आहे. मागासवर्गीयांना ५२, महिला १३, मुस्लीम १५, जैन व ख्रिश्‍चन प्रत्येकी २, लिंगायत ४२, रेड्डी लिंगायत ६, वक्कलिग व रेड्डी वक्कलिग ३९, ब्राम्हण ७, अनुसूचित जाती ३६, अनुसूचित जमाती १७ अशाप्रकारे जातनिहाय उमेदवारी देण्यात आली आहे. 

यावेळी ७० पेक्षा अधिक वयाच्या केवळ ७ उमेदवारांना तिकिट देण्यात आले आहे. युवकांना अधिक प्राधान्य देण्यात आले असून २५ ते ४० वयोगटातील २४ उमेदवार, ४१ ते ५० वयोगटातील ४९ उमेदवार, ५१ ते ६० वर्षे वयोगटातील ७२, ६१ ते ७० वर्षे वयोगटातील ६६ उमेदवारांना काँग्रेसचे तिकिट देण्यात आले आहे.

Web Title: Belgaum News Karnataka assembly election