बेळगाव उत्तरमध्ये कॉंग्रेसच्या बालेकिल्ल्यात फुलले "कमळ' 

बेळगाव उत्तरमध्ये कॉंग्रेसच्या बालेकिल्ल्यात फुलले "कमळ' 

मतदारसंघ : बेळगाव उत्तर 

बेळगाव उत्तर मतदारसंघ म्हणजे कॉंग्रेसचा बालेकिल्ला. 2008 मध्ये मतदारसंघ पुनर्रचना झाल्यापासून कॉंग्रेसच्या फिरोज सेठ यांनी या मतदारसंघाचे प्रतिनिधीत्त्व केले. पण, त्यांच्या वर्चस्वाला सुरुंग लावून याठिकाणी पहिल्यांदाच "कमळ' फुलविण्याची किमया भाजपचे तरुण उमेदवार अॅड. अनिल बेनके यांनी केली आहे. हिंदू मतांचे झालेले ध्रुवीकरण हा त्यांच्या विजयातील महत्त्वाचा घटक ठरला आहे. 

संमिश्र लोकवस्तीच्या बेळगाव उत्तर मतदारसंघात लिंगायत समाजाचा वरचष्मा असला तरी मुस्लिम आणि मराठा मतेही लक्षणीय आहेत. मुस्लिमांची एकगठ्ठा मते नेहमीच कॉंग्रेसच्या पाठीशी राहिली आहेत. तर हिंदू मते भाजप, धजद व महाराष्ट्र एकिकरण समितीत विभागली जातात. त्यामुळे, आतापर्यंत कॉंग्रेसचा उमेदवार आरामात निवडून येत होता. पण, गेल्या पाच वर्षात या मतदारसंघात अनेक धार्मिक दंगली झाल्या. त्याची झळ दोन्ही समाजातील लोकांना बसली. विशेषता शहराच्या मध्यवस्तीत होणाऱ्या या दंगलींना सर्वसामान्य कंटाळले होते. त्याचे प्रतिबिंब या निकालातून उमटले आहे. 

अॅड. अनिल बेनके गेल्या दहा वर्षांपासून निवडणुकीची तयारी करत होते. 2013 च्या निवडणुकीवेळी पक्षाने त्यांना तिकिट नाकारले होते. तरी त्यांनी बंडखोरी न करता आणखी पाच वर्षे वाट पाहिली. यंदाही या मतदारसंघातून भाजपचे तिकिट मिळवण्यासाठी चुरस होती. पण, पक्षाने तिकिट देऊन त्यांच्यावर विश्‍वास दाखवला. हा विश्‍वास त्यांनी ऐतिहासिक विजय मिळवून सार्थ ठरवला आहे. 

कॉंग्रेसने विद्यमान आमदार फिरोज सेठ यांनाच उमेदवारी दिली होती. मध्यवर्ती महाराष्ट्र एकिकरण समितीने याठिकाणी उमेदवारच दिला नव्हता. धजदचा उमेदवारही प्रभावी नव्हता. त्यामुळे, हिंदू मतांची विभागणी टळली. तसेच न्यू गांधीनगरमधील प्रचारफेरीवेळी "पाकिस्तान झिंदाबाद'च्या घोषणा दिल्याचा व्हिडिओ ऐन रणधुमाळीत व्हायरल झाल्याने आमदार सेठ बॅकफूटवर गेले. या घोषणांमुळे हिंदू मते भाजपकडे वळली अन्‌ अॅड. बेनकेंचा विजय सुकर झाला. 

मतांची आकडेवारी 

  • अॅड. अनिल बेनके : 79,015 
  • फिरोज सेठ : 61518 
  • बाळासाहेब काकतकर : 1,865 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com