बेळगाव: महापालिकेच्या सर्वसाधारण बैठकीत हमरीतुमरी

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 27 सप्टेंबर 2017

अजेंड्यावरील विषयावर बोला, प्रभागातील समस्या मांडू नका अशी सूचना महापौरानी बैठकीच्या प्रारंभी दिली. त्याला विरोधी गटाचे नगरसेवक दिनेश नाशीपुडी यानी आक्षेप घेतला. यावेळी नाशीपुडी व महापौर संज्योत बांदेकर यांच्यात शाब्दिक चकमक झाली. त्यावर नाशीपुडी थेट पिठासीनासमोर गेले व हातातील कागदपत्रे त्यानी जमिनीवर टाकून बसकन मारली.

बेळगाव : महापालिकेच्या सर्वसाधारण बैठकीची सुरूवात बुधवारी हमरीतुमरी व गोंधळाने झाली.

अजेंड्यावरील विषयावर बोला, प्रभागातील समस्या मांडू नका अशी सूचना महापौरानी बैठकीच्या प्रारंभी दिली. त्याला विरोधी गटाचे नगरसेवक दिनेश नाशीपुडी यानी आक्षेप घेतला. यावेळी नाशीपुडी व महापौर संज्योत बांदेकर यांच्यात शाब्दिक चकमक झाली. त्यावर नाशीपुडी थेट पिठासीनासमोर गेले व हातातील कागदपत्रे त्यानी जमिनीवर टाकून बसकन मारली.

नाशीपुडी यांच्या या कृतीला सत्ताधारी गटाच्या नगरसेवकांनी आक्षेप घेतला. त्यावेळी विरोधी गटाचे नगरसेवक नाशीपुडी यांच्या समर्थनार्थ पीठासीनासमोर आले. त्यानी महापौरांच्या विधानावर आक्षेप घेतला, त्यातून गोंधळाला सुरूवात झाली. सत्ताधारी गटाचे नगरसेवकही आक्रमक झाल्यामुळे गोंधळ वाढला. यावेळी सत्ताधारी गटाचे नगरसेवक राकेश पलंगे यानी नाशीपुडी यांना जागेवर बसण्याची विनंती केली. पण त्याला नाशीपुडी यानी प्रतिसाद दिला नाही, उलट त्यानी पलंगे यांना जाब विचारला. त्यातून पलंगे व नाशीपुडी एकमेकांच्या अंगावर धावून जाण्याचा प्रकार घडला.

दोन्ही गटाच्या नगरसेवकांनी ही हमरीतुमरी सोडविली. आमदार संभाजी पाटील यानी घडलेला प्रकार चुकीचा असल्याचे सांगितले. त्यावर आधी अजेंड्यावरील विषयांवर चर्चा होईल, त्यानंतर नगरसेवकांनी प्रभागातील समस्या मांडाव्यात असे सांगितले. महापौरानी समंजस भूमिका घेतल्यामुळे या वादावर पडदा पडला.