पावगड सौरऊर्जा प्रकल्पाचा पहिला टप्पा डिसेंबरपर्यंत

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 22 ऑक्टोबर 2017

बेळगाव - राज्याचा महत्वकांक्षी आणि जगातील अधिक वीजनिर्मिती करणाऱ्या प्रकल्पापैकी एक असणाऱ्या पावगड सौरऊर्जा प्रकल्पाचा पहिला टप्पा येत्या डिसेंबरपर्यंत पूर्ण केला जाणार आहे. प्रकल्पाची वीजनिर्मिती क्षमता दोन हजार मेगावॉट असून पहिल्या टप्प्यातून ६०० मेगावॉट वीज उत्पादीत होणार आहे. सुमारे १४ हजार ४२५ कोटींच्या या प्रकल्पाचे उद्‌घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. 

आंध्र प्रदेश व कर्नाटकच्या सीमेवर असलेल्या पावगड तालुक्‍यातील पाच गावांमध्ये हा सौरऊर्जा प्रकल्प साकारला जात आहे. त्यासाठी १३ हजार एकर जमीन संपादित केली आहे. प्रकल्प उभारणीसाठी १२ हजार कोटी खर्च करण्यात येणार असून मुलभूत सुविधांसाठी ८२५ कोटी रुपये खर्च केले जात आहेत. सेंट्रल पॉवर ग्रीडकडून १,६०० कोटी रुपये अनुदान देण्यात आले आहे.

या प्रकल्प आवारात सुमारे ७५ किमी अंतराच्या रस्त्याची उभारणी करण्यात येत आहे. प्रकल्प कार्यान्वित झाल्यानंतर अपारंपरिक क्षेत्रातून वीज उत्पादन करणारे राज्य म्हणून कर्नाटक देशात अग्रेसर ठरणार आहे.  मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि ऊर्जामंत्री डी. के. शिवकुमार यांनी या प्रकल्पाची नुकतीच पाहणी केली असून कामाचा आढावा घेतला आहे.

त्यानुसार डिसेंबरपर्यंत प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्याचे काम पूर्ण होणार असून पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते त्याचे लोकार्पण केले जाणार असल्याची माहिती ऊर्जा विभागाने दिली आहे. सध्या प्रकल्पाचे काम युद्धपातळीवर सुरू असून राज्यातील हेस्कॉम, बेस्कॉम, मेस्कॉम, गेस्कॉम, चेस्कॉम या वीजवितरण कंपन्यांनाही यातून वीज पुरविली जाणार असल्याचे विभागाने स्पष्ट केले आहे. 

या प्रकल्पामुळे सुमारे ४ हजार तरुणांना रोजगाराची संधी मिळाली आहे. तसेच अन्य उद्योगांनाही चालना मिळाली आहे. सुरुवातीला प्रकल्प व भूसंपादनाला विरोध झाला असला तरी सरकारच्या मध्यस्थीनंतर विरोध मावळला आहे.