कुख्यात गुंडाचा न्यायालयात पोलिसावर हल्ला

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 8 सप्टेंबर 2017

न्यायाधिशांसमोर माफीचे नाटक; कर्नाटक-महाराष्ट्रातील ठाण्यांमध्ये गुन्हे

बेळगाव: कोकासारख्या प्रकरणात संशयित असलेल्या कुख्यात गुंडाने आज (शुक्रवार) भर न्यायालयात पोलिसावर हल्ला केल्याची घटना दुपारी एकच्या सुमारास घडली. न्यायालयात हजर करण्यासाठी घेऊन आले असता त्याने हा प्रकार केला. त्यामुळे जेएमएफसी द्वितीय न्यायालयासमोर एकच गोंधळ उडाला. न्यायालयात गेल्यानंतर मात्र सोज्वळपणाचा आव आणत त्याने न्यायाधिशांसमोर माफीचे नाटक केले.

बेळगाव पोलिसांनी धारवाड येथे अटकेत असलेल्या नितीन दाबले नावाच्या कुख्यात गुन्हेगाराला बॉडी वॉरंटद्वारे चौकशीसाठी बेळगावात आणले आहे. मुंबई, कोल्हापूर, ठाणे व महाराष्ट्रात अन्य ठिकाणासह कर्नाटकातील विविध पोलीस ठाण्यांमध्ये त्याच्यावर सुमारे 23 हून अधिक गुन्हे आहेत. कोकासह खून, खुनी हल्ला, खंडणी, हाणामारी अशा अनेक गुन्ह्यांमध्ये त्याला यापूर्वी अटक झाली आहे. बेळगाव परिसरातील माळमारुती पोलिस ठाण्याच्या हद्दीतही त्याने काही गुन्हे केल्याचा संशय आहे. त्यामुळे त्याची चौकशी सुरू आहे.

चौकशीनंतर आज दुपारी एकच्या सुमारास त्याला माळमारुती पोलीस ठाण्याच्या पथकाने न्यायालयात हजर केले. जेएमएफसी द्वितीय न्यायालयासमोर त्याला घेऊन माळमारुती ठाण्याचे चार पोलीस थांबले होते. यावेळी नितीन हा मोठमोठ्याने बोलत होता. एस. एम. मुकन्नवर नावाच्या पोलिसाने त्याला शांत बसण्यास सांगितले. परंतु, तो शांत न होता अधिकच जोराने बोलू लागला. त्यामुळे त्याला रागाने गप्प बसण्याची सूचना केली. याच रागातून नितीनने चक्क पोलिसावरच हल्ला चढवला. यामध्ये त्यांना किरकोळ दुखापत झाली.

घटनेची माहिती कळताच मार्केटचे पोलीस उपनिरीक्षक आर. बी. सौदागर घटनास्थळी दाखल झाले. यावेळी दोघा पोलिसांना सोबत घेऊन नितीन हा मोठमोठ्याने काही तरी सांगत होता. पोलिसांनी त्याला न्यायालयासमोर हजर करून त्याची कारागृहात रवानगी केली. परंतु, अटक करून आणलेल्या पोलिसावरच हल्ला केल्यामुळे न्यायालय परिसरात हा चर्चेचा विषय बनला होता.

'ई सकाळ'वरील इतर महत्त्वाच्या बातम्या : 

सदाभाऊ यांचा अखेर 'सवतासुभा'

इनक्‍युबेटरचा सरसकट वापर अनावश्‍यक

ओडिशात आघाडी करणार नाही: अमित शहा

फिरोज, ताहीर यांना फाशीची शिक्षा

श्रुती बडोले यांनी शिष्यवृत्ती अर्ज घेतला मागे

उच्चशिक्षण क्षेत्रासमोरच्या आव्हानांवर चिंतन

बैलांच्या शर्यतींबाबतचा मसुदा अंतिम टप्प्यात

तरंगत्या सौर पॅनेलद्वारे 'उजनी'वर ऊर्जानिर्मिती शक्‍य

हिंसाचाराला "डेरा'चे आर्थिक पाठबळ

कोमलला मिळाले मदतीचे ‘हृदय’