बस डे मुळे परिवहनला 66 हजारांचा अतिरिक्‍त महसूल

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 23 नोव्हेंबर 2017

बेळगाव - वाढते प्रदूषण आणि सातत्याने होणाऱ्या वाहतूक कोंडीवर उपाय म्हणून महिन्यातील एक दिवस ‘बस डे’ म्हणून साजरा करण्याचा निर्णय वायव्य परिवहन महामंडळाने घेतला होता. त्यानुसार २० तारखेला पहिला ‘बस डे’ साजरा झाला. यादिवशी नेहमीपेक्षा ८,५७९ अधिक प्रवाशांनी बसमधून प्रवास केला. परिवहन महामंडळाला ६५,३४८ रुपयांचा अतिरिक्‍त महसूल प्राप्त झाला.

बेळगाव - वाढते प्रदूषण आणि सातत्याने होणाऱ्या वाहतूक कोंडीवर उपाय म्हणून महिन्यातील एक दिवस ‘बस डे’ म्हणून साजरा करण्याचा निर्णय वायव्य परिवहन महामंडळाने घेतला होता. त्यानुसार २० तारखेला पहिला ‘बस डे’ साजरा झाला. यादिवशी नेहमीपेक्षा ८,५७९ अधिक प्रवाशांनी बसमधून प्रवास केला. परिवहन महामंडळाला ६५,३४८ रुपयांचा अतिरिक्‍त महसूल प्राप्त झाला. त्यामुळे, पुढील ‘बस डे’लाही यापेक्षा अधिक प्रतिसाद द्यावा, असे आवाहन वायव्य कर्नाटक परिवहन महामंडळाने केले आहे.

वायव्य परिवहन महामंडळाने यापूर्वी हुबळी शहरात दर महिन्यातील एक दिवस ‘बस डे’ म्हणून साजरा करण्यास सुरुवात केल्यानंतर या ठिकाणी प्रतिसाद मिळाला. त्यानुसार बेळगाव विभागातही दरमहा २० तारखेला ‘बस डे’ साजरा करण्याचा निर्णय घेतला. परिवहन महामंडळाने याबाबत मोठ्या प्रमाणात जनजागृती केली होती. वाढत्या प्रदूषणाला आळा घालण्यासाठी हातभार लावण्याचे आवाहन केले होते.

‘बस डे’ रोजी परिवहन मंत्री एच. रेवण्णा, उद्योग मंत्री आर. व्ही. देशपांडे, वायव्य परिवहन महामंडळाचे अध्यक्ष सदानंद डंगण्णावर आदींनी बसमधून प्रवास केला होता. तसेच लोकांना या उपक्रमात सहभागी होण्याचे आवाहन केले होते. त्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत रोजच्यापेक्षा ८,५०० हून अधिक प्रवाशांनी बस प्रवास केला. आगामी काळात या मोहिमेला अधिक प्रतिसाद मिळेल, असा विश्‍वास वायव्य परिवहन महामंडळाचे अध्यक्ष डंगण्णावर यांनी व्यक्‍त केला आहे. 

बस डे दरमहा २० तारखेला साजरा होणार असला तरी तो सोमवारी साजरा केला जाणार आहे. बस डेला ६५ हजार रुपयांपेक्षा अधिक महसूल प्राप्त झाला. त्याचप्रमाणे इतर उपक्रम राबवून महसूल वाढीसाठी प्रयत्न करण्यात येणार आहेत, तसेच आवश्‍यकतेनुसार बसफेऱ्यांतही वाढ करण्यात येणार आहे, अशी माहिती परिवहन महामंडळाने दिली आहे. 

‘बस डे’ ही संकल्पना चांगली असून यामुळे महसुलात वाढ होणार आहे. तसेच प्रदूषण कमी होण्यास मदत मिळणार आहे. ‘बस डे’ बाबत अधिक जनजागृती होणे आवश्‍यक आहे. त्यादृष्टीने प्रयत्न सुरू आहेत. लोकांनी ‘बस डे’ला प्रतिसाद द्यावा.
- गणेश राठोड, 

विभागीय नियंत्रक

Web Title: Belgaum news successful Experiment of Bus day in city