दगडी कोळसा घोटाळ्याची सीबीआय चौकशी करावी - सुरेश अंगडी

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 22 ऑक्टोबर 2017

बेळगाव - राज्याच्या राजकारणात काम करण्याची बिलकुल इच्छा नाही. त्यामुळे विधानसभा निवडणूक लढविणार नाही, असे स्पष्ट करतानाच केपीसीएल दगडी कोळसा घोटाळ्याची सीबीआयमार्फत चौकशी करावी, अशी मागणी खासदार सुरेश अंगडी यांनी रविवारी (ता. २२) केली. आपल्या निवासस्थानी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. 

ते म्हणाले, ‘‘केपीसीएल दगडी कोळसा खाण घोटाळ्यात मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांचा सहभाग असल्याचा आरोप भाजप प्रदेशाध्यक्ष बी. एस येडियुराप्पा यांनी केला आहे. एकूण ४२८ कोटी रुपयांचा गैरव्यवहार झाल्याची तक्रार आहे. या प्रकरणाची चौकशी सीबीआमार्फत केली तरच सत्य बाहेर येऊ शकेल.’’

टिपू सुलतान जयंती साजरी करणे राज्य सरकारने बंद करावे. माझा जयंतीला विरोध असला तरी मी मुस्लिमविरोधी नाही. दिवंगत राष्ट्रपती एपीजे अब्दुलकलाम यांना मी आदर्श मानतो. पण सत्ताधारी काँग्रेस सरकार केवळ व्होट बॅंकेसाठी टिपू सुलतान यांची जयंती साजरी करत आहे. त्याला आमचा कडाडून विरोध आहे, असेही ते म्हणाले. 

अंगडी म्हणाले, टिपू सुलतान हिंदूविरोधी होते, म्हणून त्यांना विरोध आहे. त्यांची जयंती राज्यात साजरी केली जात आहे. भविष्यात गुजरातमध्ये काँग्रेस पक्ष सत्तेवर आल्यास महम्मद गझनी जयंती साजरी करणार काय, असा सवाल करतानाच जयंती साजरी करताना राष्ट्रएकता, सौहार्दतेला धक्का पोचणार नाही, याची काळजी घ्यायला हवी. टिपू सुलतान जयंतीच्या निमंत्रण पत्रिका छापल्या जात आहेत. त्यात माझे नाव न घालण्याची विनंती जिल्हा प्रशासनाकडे करणार असल्याचे खासदार अंगडींनी सांगितले.