बेळगावात बारा तासांत दोन अपघात, तिघे ठार

file photo
file photo

बेळगाव: शहर परिसरात बारा तासात झालेल्या दोन अपघातांमध्ये तिघेजण ठार झाले, तर एक तरुण जखमी झाला. दुचाकीस्वाराला दूधवाहू टॅंकरने धडक दिल्याने तो जागीच ठार झाला. आज (सोमवार) सकाळी साडेदहाच्या सुमारास उद्यमबागमधील बेम्को क्रॉसजवळ हा अपघात घडला. याकुब शेखसुराब (46, रा. फोर्ट रोड) असे मृताचे नाव आहे.

दुसरा अपघात रविवारी (ता. 10) रात्री घडला. बर्डे ढाब्यावर जेवणासाठी जाणाऱ्या शहरातील तीन तरुणांच्या दुचाकीला कंटेनरची पाठीमागून धडक बसली. यामध्ये दोघे जागीच ठार झाले, तर एकजण जखमी झाला. हा अपघात साडेअकराच्या सुमारास हिंडाल्को पुलाजवळ घडला. बाळकृष्ण मारुती पिंगट (24, भातकांडे गल्ली) व विनायक रघुनाथ जाधव (25, बापट गल्ली) अशी मृतांची नावे आहेत. यामध्ये प्रतीक सुभाष जाधव (22, रा. बापट गल्ली) हा तरुण गंभीर जखमी झाला.

आज सकाळी घडलेल्या अपघाताची माहिती अशी की, टाटा मोटर्समध्ये टेक्‍निशियन म्हणून काम करणारे याकुब शेखसुराब हे कामानिमित्त बेळगावला आले होते. काम अटोपून ते पुन्हा माणिकबाग शोरूममध्ये निघाले होते. माणिकबाग शोरूमजवळ रस्ता ओलांडताना पाठीमागून येणाऱ्या कंटेनरचा त्यांना अंदाज आला नाही. त्यामुळे कंटेनरचे चाक त्यांच्या अंगावरून गेल्याने ते जागीच ठार झाले. अपघातानंतर घटनास्थळी मोठी गर्दी झाली होती.

रविवारी रात्री घडलेल्या अपघातात शहरातील तिघे तरुण बर्डे धाब्याकडे जेवणासाठी निघाले होते. यावेळी नियंत्रण चुकलेल्या कॅन्टरने या तिघांना पाठीमागून धडक दिली. तिघेही रस्त्यावर कोसळले. यावेळी बाळकृष्ण विनायक या दोघांच्या डोक्‍याला गंभीर दुखापत झाल्याने ते जागीच ठार झाले, तर प्रतिक गंभीर जखमी झाला. त्याच्यावर खासगी रूग्णालयात उपचार सुरू आहेत. घटनेची माहिती मिळताच वाहतूक उत्तर विभाग पोलीस ठाण्याचे निरीक्षक आर. आर. पाटील व त्यांच्या सहकाऱ्यांना घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. दोन्ही मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी जिल्हा रूग्णालयात हलविण्यात आले. याची नोंद वाहतूक उत्तर विभाग पोलिसांत झाली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News
www.esakal.com