कर्नाटक मुख्यमंत्र्यांसह मंत्रिमंडळ कमिशन एजंट - येडियुराप्पा

कर्नाटक मुख्यमंत्र्यांसह मंत्रिमंडळ कमिशन एजंट - येडियुराप्पा

निपाणी - राज्यातील जनतेच्या पैशाचा सदुपयोग झाला पाहिजे, पण कॉंग्रेस सरकार जनतेचा पैसा धुळीस मिळवत आहे. मुख्यमंत्री सिध्दरामय्या व सर्व मंत्रिमंडळ कमिशन एजंट म्हणून काम करीत असल्याचा गंभीर आरोप भाजप प्रदेशाध्यक्ष बी. एस. येडीयुराप्पा यांनी केला.

मंगळवारी (ता. 21) येथे राज्य भाजपकडून आयोजित नव कर्नाटक परिवर्तन यात्रेनिमित्त आयोजित कार्यकर्त्यांच्या सभेत ते बोलत होते. यावेळी केंद्रीय मंत्री रमेश जिगजिनगी, खासदार शोभा करंदलाजे, आमदार शशिकला जोल्ले, उमेश कत्ती यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते. 

प्रदेशाध्यक्ष येडीयुराप्पा म्हणाले, "आपल्या नेतृत्वाखाली राज्यात भाजप सरकार असताना स्वच्छ व जनहिताची सेवा दिली आहे. अनेक योजना यशस्वीपणे राबवून सामान्यांचे जीवनमान उंचावले आहे. विद्यमान कॉंग्रेस सरकार भ्रष्टाचारात गुंतले असून जनतेला सेवा देण्यात अपयशी ठरले आहे. मुख्यमंत्री सिध्दरामय्या निद्रावस्थेत असल्याचे सोंग घेऊन काम करीत आहेत. जाती-धर्मात भांडणे लावून समाजातील शांतता बिघडविण्याचे कार्य राज्य सरकार जाणीपूर्वक करीत आहे. केंद्रात नरेंद्र मोदी सरकारने तीन वर्षात क्रांतीकारी कार्य केले असून नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली राज्याच्या विकास करण्यासाठी राज्यात भाजपला सत्ता द्यावी. कर्नाटक आदर्श राज्य बनविण्याचे आपले ध्येय आहे. केंद्राने विविध योजनांसाठी निधी मंजूर केला तरी राज्य सरकारकडून तो आणला जात नाही. जो निधी आणला जातो, त्यात भ्रष्टाचार करण्यात मात्र मुख्यमंत्री व अन्य मंत्री आघाडीवर आहेत. राज्यात भाजपला सत्ता देऊन निपाणीत शशिकला जोल्ले यांना निवडून दिल्यास मागेल तेवढा निधी देण्यात येईल.' 

आमदार शशिकला जोल्ले म्हणाल्या, "राज्यातील कॉंग्रेसला मूळापासून उपटून टाकण्याची वेळ आगामी निवडणुकीच्या रूपाने आली आहे. निपाणी मतदार संघात कित्येक कामे केलीतरी शेती, शिक्षण, पाणी अशा अनेक समस्या राहिल्या आहेत. त्यासाठी येडीयुराप्पा यांनी लक्ष घालून मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करावेत. येणाऱ्या निवडणुकीत देखील पुन्हा संधी दिल्यास दहा पटीने निधी आणू. जनता हीच माझी ताकद असून केलेल्या कामाच्या पाठीशी रहावे." 

केंद्रीय मंत्री रमेश जिगजिनगी, खासदार डॉ. प्रभाकर कोरे, माजी खासदार रमेश कत्ती यांनी निपाणीसह राज्यात भाजपला निवडून देण्याचे आवाहन केले. 

आमदार उमेश कत्ती, सहकार नेते अण्णासाहेब जोल्ले, बसवप्रसाद जोल्ले, श्री. रविकुमार, श्री. वामनय्या, जिल्हा पंचायत सदस्या सुमित्रा उगळे, सिध्दू नराटे, शहर भाजप अध्यक्ष जयवंत भाटले, ऍड. संजय शिंत्रे, एम. पी. पाटील, समित सासणे, आप्पासाहेब जोल्ले, रामगोंड पाटील, विभावरी खांडके यांच्यासह नगरसेवक शहर व ग्रामीण भागातील कार्यकर्ते उपस्थित होते. शशिकांत नाईक यांनी आभार मानले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com