बंगालमध्ये लष्कर तैनातीवरून वादंग

mamata-manohar
mamata-manohar

कोलकाता - पश्‍चिम बंगालमध्ये टोल नाक्‍यांसह विविध ठिकाणी लष्कराचे जवान तैनात करण्यात आल्याच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, केंद्र सरकार आणि लष्कर यांच्यात शुक्रवारी आरोप-प्रत्यारोप आणि खुलाशांचे वादळ घोंघावले. लष्करी बंडाच्या सांशकतेने ममता बॅनर्जी यांनी तर संपूर्ण रात्र राज्य सचिवालयात घालविली.  

यांनी लष्कर तैनातीच्या मुद्यावरून केंद्र सरकारवर जोरदार हल्ला चढविताना, लष्कराच्या साहाय्याने केंद्र सरकार राज्यातील तृणमूल काँग्रेसच्या सरकारविरोधात कट रचत असल्याची सांशकताही व्यक्त केली. पश्‍चिम बंगालमध्ये असलेली लष्कराची उपस्थिती हा नैमित्तिक सरावाचा भाग आहे. गेल्या १५-२० वर्षांपासून हा सराव केला जातो. पश्‍चिम बंगालमधील पोलिसांना विश्वासात घेऊनच हा सराव करण्यात आल्याचे संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांनी शुक्रवारी लोकसभेत स्पष्ट केले, तर लष्करानेही हा दैनंदिन कामकाजाचा भाग असून, याबाबतची माहिती स्थानिक प्रशासन आणि पोलिसांना देण्यात आली होती, असा दावा करतानाच त्याबाबतचे पुरावेही सादर केले. 

जवानांच्या उपस्थितीला विरोध दर्शविताना ममता बॅनर्जी आजही राज्याच्या सचिवालयातच थांबल्या होत्या. हे लष्करी बंड तर नाही ना, असा प्रश्‍न त्यांनी उपस्थित केला. दरम्यान, सचिवालयाजवळ असलेल्या टोल नाक्‍यावरून काल (गुरुवारी) रात्रीच जवान निघून गेले आहेत. 

ममता यांनी राज्य सचिवालय नबन्नामध्ये काल रात्री उशिरा पत्रकारांशी संवाद साधला. त्या म्हणाल्या, की आमच्या लोकशाहीच्या सुरक्षेसाठी मी सचिवालयातच थांबणार आहे. मुर्शिदाबाद, जलपाईगुडी, दार्जीलिंग, उत्तर २४ परगना, वर्धमान, हावडा आणि हुगली आदी जिल्ह्यांत लष्कराचे जवान तैनात करण्यात आले आहेत. राज्य सरकारला कोणतीही सूचना न देता लष्कराला तैनात करण्यात आले आहे. ही अतिशय गंभीर बाब आहे. 

ममता यांनी आकांडतांडव सुरू केल्यानंतर मेजर सुनील यादव यांनी लष्कराच्या संचलनासाठी केला जाणारा हा नियमित सराव असल्याची माहिती दिली. ते म्हणाले, की स्थानिक पातळीवर वार्षिक डाटा जमा करण्याचे काम लष्कराची ईस्टर्न कमांड करत आहे. विविध राज्यांतील सर्व प्रवेश नाक्‍यांवर केवळ अवजड वाहनांची माहिती जमा करण्यात येत आहे. दरवर्षी हा सराव केला जातो. त्यासाठी लष्कर स्थानिक पोलिसांचीही मदत घेते. 

पश्‍चिम बंगाल सरकार आणि पोलिसांशी झालेल्या पत्रव्यवहारही लष्कराने माध्यमांसमोर दाखविला. सरकार आणि पोलिसांना ९ पत्रे दिली असल्याचे सांगत ही कागदपत्रेही त्यांनी दाखविली. अवजड वाहनांकडून पैसेवसुली करण्यासाठी लष्कर तैनात करण्यात आल्याचा आरोपही निराधार असल्याचे त्यांनी सांगितले.

ईशान्य भारतातील राज्यांमध्ये आम्ही नेहमीच या प्रकारचा सराव करतो. आसाममधील १८ ठिकाणी, अरुणाचल प्रदेशातील १३, पश्‍चिम बंगालमधील १९, मणिपूरमधील ६, नागालॅंडमधील ५, मेघालयातील ५, तर त्रिपुरा आणि मिझोराममधील प्रत्येकी एका ठिकाणी लष्कराचे जवान तैनात करण्यात आले आहेत, अशी माहिती लष्कराकडून देण्यात आली.

ममता बॅनर्जींचा आरोप

नोटाबंदीच्या निर्णयाच्या विरोधाचा आवाज बनले असताना अशाप्रकारे लष्कराच्या मदतीने सरकार उलथविण्याचा प्रयत्न तर होत नाही ना? केंद्राने राज्य सरकारला न कळविताच लष्कर तैनात करणे ही अतिशय गंभीर बाब असून, आणीबाणीपेक्षाही भयानक स्थिती आहे. हा संघराज्य रचनेवरील हल्ला आहे. आम्हाला याचे स्पष्टीकरण हवे. 

मनोहर पर्रीकरांचे स्पष्टीकरण

ईशान्येकडील राज्यांमध्ये गेल्या १५ ते २० वर्षांपासून अशा पद्धतीने काही कालावधीसाठी लष्कराचे जवान तैनात केले जातात आणि संबंधित राज्यांतील पोलिसांना विश्वासात घेतले जाते. बंगालमधील पोलिसांनाही विश्वासात घेण्यात आले होते. काही ठिकाणी पोलिसही जवानांसोबत उपस्थित होते. राजकीय नैराश्‍यातून ममता आरोप करीत आहेत.

लष्कराचा खुलासा

कोलकाता येथे २८, २९ आणि ३० नोव्हेंबर रोजी लष्कराचा सराव करण्यात येणार होता. मात्र, काही राजकीय पक्षांनी भारत बंद पुकारल्याने कोलकाता पोलिसांनी असमर्थता दर्शविली. परिणामी १ आणि २ डिसेंबर रोजी हा सराव करण्यात आला आणि याबाबतची माहिती पोलिसांनाही देण्यात आली होती. सरकार आणि पोलिसांना आम्ही ९ पत्रे दिली आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com