अमित शहांचा पाहुणचार करणारे कुटुंब 'तृणमूल'वासी 

वृत्तसंस्था
बुधवार, 3 मे 2017

महाली कुटुंब अनेक वर्षांपासून भाजपमध्ये आहे. ममता बॅनर्जी यांच्या गुंडांनीच त्यांचे काही दिवसांपूर्वी अपहरण केले होते. तृणमूल कॉंग्रेसमध्ये प्रवेश करावा म्हणून त्यांच्यावर दबाव आणण्यात आला होता.

कोलकता - भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा हे पश्‍चिम बंगालमधील नक्षलबाडीच्या दौऱ्यावर असताना त्यांनी ज्या आदिवासी कुटुंबाच्या घरी जेवण केले होते, त्या कुटुंबानेच आता "तृणमूल कॉंग्रेस'मध्ये प्रवेश केल्याची आश्‍चर्यजनक माहिती समोर आली आहे. दोन दिवसांपूर्वी हे कुटुंब अचानक गायब झाल्यानंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष दिलीप घोष यांनी "एफआयआर' दाखल केला होता. 

या राजकीय नाट्याबाबत घोष म्हणाले, "महाली कुटुंब अनेक वर्षांपासून भाजपमध्ये आहे. ममता बॅनर्जी यांच्या गुंडांनीच त्यांचे काही दिवसांपूर्वी अपहरण केले होते. तृणमूल कॉंग्रेसमध्ये प्रवेश करावा म्हणून त्यांच्यावर दबाव आणण्यात आला होता.''

माध्यमांशी बोलताना गीता महाली म्हणाल्या, "आम्हाला कोणीही धमकी दिलेली नाही किंवा पैशांचे आमिषदेखील दाखविलेले नाही. पूर्वीपासूनच आमची पहिली पसंद ममता बॅनर्जी याच होत्या, त्यामुळेच आम्ही तृणमूल कॉंग्रेसमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला.'' संधी मिळाली तर ममता बॅनर्जी यांनाही जेवू घालणार का, असा सवाल पत्रकारांनी करताच गीता म्हणाल्या, की त्या येथे आल्या तर नक्कीच त्यांना जेवू घालू. पश्‍चिम बंगालचे पर्यटनमंत्री गौतम देव यांनी रोजच्या संघर्षास कंटाळून या कुटुंबाने तृणमूल कॉंग्रेसमध्ये प्रवेश केल्याचे सांगितले.