भागवत यांच्या नावाला पक्षाचा नकार: अमित शहा

पीटीआय
सोमवार, 22 मे 2017

राष्ट्रपतिपदासाठी माझ्या मनात एखादे नाव असले तरी, त्याविषयी प्रथम पक्षनेत्यांबरोबर चर्चा होणे महत्त्वाचे आहे, असे शहा यांनी स्पष्ट करत भागवत यांच्या विषयीचा प्रस्ताव खुद्द संघालाही मान्य नसल्याचे सांगितले

नवी दिल्ली - आगामी राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाच्या उमेदवाराबाबत अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही, अशी माहिती पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी आज दिली. शिवसनेने रा.स्व.संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांच्या नावाचा ठेवलेला प्रस्ताव पक्षाकडून नाकारण्यात आल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

एका खासगी वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत अमित शहा बोलत होते. राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांचा कार्यकाळ जुलै महिन्यात संपत असून, कॉंग्रेस व विरोधी पक्षांनी संयुक्त उमेदवार देण्यासंदर्भात हालचाली सुरू केल्या आहेत. या पार्श्वभूमीवर सत्तारुढ भाजपचा उमेदवार कोण असेल, या प्रश्नास उत्तर देताना पक्षाने याबाबत अद्याप कोणताही निर्णय घेतला नसल्याचा खुलासा शहा यांनी केला.

राष्ट्रपतिपदासाठी माझ्या मनात एखादे नाव असले तरी, त्याविषयी प्रथम पक्षनेत्यांबरोबर चर्चा होणे महत्त्वाचे आहे, असे शहा यांनी स्पष्ट करत भागवत यांच्या विषयीचा प्रस्ताव खुद्द संघालाही मान्य नसल्याचे सांगितले. काश्‍मिरातील सद्यःस्थितीबाबत चिंता करण्याचे कारण नाही. मोदींच्या नेतृत्वाखालील सरकार लवकरच तेथील परिस्थिती नियंत्रणात आणेल, असा विश्वासही शहा यांनी व्यक्त केला.

रजनीकांत यांचे स्वागतच
तमीळ सुपरस्टार यांनी राजकारणात येण्याचे संकेत दिले असून, ते भाजपमध्ये प्रवेश करतील का, या प्रश्नावर बोलताना शहा म्हणाले, रजनीकांत यांनी स्वतः हा निर्णय घेतला आहे. त्यांच्यासह त्यांच्या पक्षाचे आम्ही स्वागतच करू. चांगल्या लोकांना पक्षात नेहमीच स्थान दिले जाईल.

शहा म्हणाले...
- काश्‍मीरविषयी बोलण्याचा कॉंग्रेसला अधिकार नाही
- झारखंडमध्ये जमावाने केलेल्या कृत्याचा संबंध पक्षाशी जोडू नये
- मोदी सरकारच्या काळात गुन्ह्यांमध्ये वाढ नाही; अहवाल पाहा
- मोदी सरकारने जनतेचा विश्वास जिंकला आहे