उत्तर प्रदेशात भाजपचे प्रभुत्व;इतर राज्यांत चुरस

वृत्तसंस्था
गुरुवार, 9 मार्च 2017

उत्तर प्रदेशमधील सत्ताचित्रासंदर्भात व्यक्‍त करण्यात आलेल्या अन्य एका "एक्‍झिट पोल'नुसार भाजपला राज्यात 190/210 जागा मिळतील; तर सपा-कॉंग्रेस युतीस 110/130 जागा जिंकण्यात यश येईल

नवी दिल्ली - 2019 मध्ये होणाऱ्या राष्ट्रीय निवडणुकीआधीची सर्वांत महत्त्वपूर्ण निवडणूक असलेल्या उत्तर प्रदेश राज्यामधील निवडणुकीसहित गोवा, मणिपूर, पंजाब व उत्तराखंड या इतर राज्यांमधील निवडणुकीसाठीचे मतदान संपल्याच्या पार्श्‍वभूमीवर, या राज्यांमधील नजीकच्या भविष्यातील सत्ताचित्राविषयी विविध अंदाज बांधणारे "एक्‍झिट पोल' प्रसिद्ध होत आहेत. या मतदानोत्तर चाचण्यांपैकी बहुतेक चाचण्यांमध्ये भारतीय जनता पक्ष हा उत्तर प्रदेशमधील सर्वांत जास्त जागा मिळविणारा पक्ष असेल, असा अंदाज वर्तविण्यात आला आहे. या चाचण्यांमधील प्रातिनिधिक अंदाज पुढीलप्रमाणे -

उत्तर प्रदेशात भाजपचे प्रभुत्व; पण... 

उत्तर प्रदेश राज्यात भाजपला मोठे यश मिळेल; मात्र तरीही पक्षास बहुमतापासून वंचित रहावे लागेल. 403 जागा असलेल्या या प्रचंड मोठ्या राज्यामधील सुमारे 185 जागा जिंकण्यात भाजपला यश येईल. मात्र तरीही पक्षास बहुमत मिळवावयास अर्थातच 16 जागा कमी पडतील. मात्र तरीही भाजपसाठी हा मोठा विजय असेल. राज्यात याआधी झालेल्या निवडणुकीमध्ये (2012) भाजपला अवघ्या 47 जागा मिळाल्या होत्या. या निवडणुकीत समाजवादी पक्ष - कॉंग्रेस युतीस राज्यामध्ये अवघ्या 120 जागा मिळतील. समाजवादी पक्षास गेल्या निवडणुकीमध्ये तब्बल 252 जागा मिळाल्या होत्या. यामुळे पक्षासाठी अवघ्या 120 जागा मिळणे हा मोठा पराभव ठरेल. याचबरोबर, मायावती यांच्या नेतृत्वाखालील बहुजन समाज पक्षाची (बसप) कामगिरी अंशत: सुधारुन पक्षास 90 जागा जिंकण्यात यश मिळेल. गेल्या निवडणुकीत बसपाला 80 जागा मिळाल्या होत्या.

उत्तर प्रदेशमधील सत्ताचित्रासंदर्भात व्यक्‍त करण्यात आलेल्या अन्य एका "एक्‍झिट पोल'नुसार भाजपला राज्यात 190/210 जागा मिळतील; तर सपा-कॉंग्रेस युतीस 110/130 जागा जिंकण्यात यश येईल. बसपला या अभ्यास पाहणीमध्ये 54 ते 74 जागा देऊ करण्यात आल्या आहेत.

पंजाबमध्ये भाजप/अकाली दल धाराशयी होईल...
पंजाब राज्यामधील निकाल हे बहुधा सर्वांत धक्कादायक असतील, अशी शक्‍यता "सीव्होटर' या संस्थेने व्यक्त केली आहे. 117 जागा असलेल्या पंजाबमध्ये सत्ता स्थापन करण्यासाठी 59 जागा आवश्‍यक आहेत. या निवडणुकीत भारतीय जनता पक्ष व शिरोमणी अकाली दल या युतीस मोठा फटका बसून आम आदमी पक्षास (आप) तब्बल 59 ते 67 पर्यंत जागा मिळतील, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. याचबरोबर, कॉंग्रेस पक्षास राज्यात 41 ते 49 जागा मिळतील, असे सीव्होटरने म्हटले आहे. या संस्थेच्या अभ्यास पाहणीमध्ये भाजप- अकाली दल युतीस अवघ्या 5/13 जागा देऊ करण्यात आल्या आहेत.

उत्तराखंड मध्ये कॉंग्रेस, भाजपमध्ये तीव्र चुरस
उत्तराखंड राज्यामध्ये भाजप व कॉंग्रेस या दोन पक्षांमध्ये अत्यंत तीव्र चुरस दिसून येईल. 70 जागा असलेल्या या राज्यांमध्ये दोन्ही पक्षांना प्रत्येकी 32 जागा मिळतील; तर "इतरां'ना 5 जागांवर विजय मिळेल. या निकालामुळे राज्यात सत्तास्थापनेसाठी अत्यंत तीव्र राजकीय स्पर्धा पहावयास मिळेल. उत्तराखंडमध्ये याआधी झालेल्या निवडणुकीत (2012) भाजपला 31; तर कॉंग्रेसला 32 जागांवर विजय मिळाला होता. राज्यातील हा निकाल येथे संघर्ष करत असलेल्या कॉंग्रेससाठी दिलासादायक असेल.

मणिपूरमध्ये भाजपची सत्ता असेल...
ईशान्य भारतामधील अत्यंत महत्त्वपूर्ण राज्य असलेल्या मणिपूरमध्ये कॉंग्रेस पक्षाची गेली 15 वर्षे अबाधित असलेली सत्ता संपुष्टात येऊन भाजपला मोठा विजय मिळेल. 60 जागा असलेल्या मणिपूर राज्यामध्ये भाजपला 25 ते 31 जागा जिंकण्यात यश येईल. कॉंग्रेसला 17 ते 23 जागा मिळतील. ही शक्‍यता प्रत्यक्षात उतरल्यास भाजपसाठी हा फार मोठा विजय ठरेल. राज्यातील त्याआधीच्या निवडणुकीमध्ये भाजपला खातेही उघडता आले नव्हते. याच निवडणुकीमध्ये कॉंग्रेसने तब्बल 42 जागा जिंकत आपले वर्चस्व दाखवून दिले होते. याचबरोबर मानवाधिकार कार्यकर्त्या इरोम शर्मिला यांच्या नव्या राजकीय पक्षासहित इतरांना मर्यादित यश मिळेल.

गोव्यामध्येही कॉंग्रेस-भाजप स्पर्धा दिसेल...
अवघ्या 40 जागा असलेल्या गोवा राज्यामध्ये सत्ता स्थापनेसाठी कॉंग्रेस व भाजपमध्ये तीव्र स्पर्धा दृष्टोपत्तीस पडेल. उत्तर गोवा व दक्षिण गोवा या दोन्ही भागांत मिळून भाजपला एकूण 15 ते 21 जागा मिळतील; तर कॉंग्रेसला सुमारे 19 जागा मिळण्याची शक्‍यता आहे. गोव्यामध्ये आपच्या कामगिरीविषयी उत्सुकता आहे. या पक्षास जास्तीत जास्त 4 जागा जिंकण्यात यश येईल; तर "इतरां'ना 2 ते 8 जागा मिळतील.

पंजाब, उत्तराखंड, गोवा व मणिपूर या राज्यांसहित उत्तर प्रदेश राज्याची निवडणूक राष्ट्रीय पातळीवरील राजकारणाच्या दृष्टिकोनामधूनही अर्थातच अत्यंत महत्त्वाची आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारसाठी उत्तर प्रदेशची निवडणूक अत्यंत संवेदनशील व आव्हानात्मक असल्याचे मानले जात आहे. गेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये या राज्यामध्ये भाजपने 72 जागा मिळवित नेत्रदीपक विजय प्राप्त केला होता. आता विधानसभा निवडणुकीमध्ये या विजयाची पुनरावृत्ती भाजपला करता येईल; अथवा नाही, हे पाहणे अत्यंत औत्सुक्‍याचे ठरणार आहे. पंतप्रधान व भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्या नेतृत्वासाठीही उत्तर प्रदेश ही मोठी कसोटी असल्याचे मानण्यात येत आहे.