विद्यार्थिनींच्या उपोषणापुढे झुकले खट्टर सरकार

वृत्तसंस्था
बुधवार, 17 मे 2017

या विद्यार्थींनीची मागणी होती, की गावातील आमच्या शाळेची बारावीपर्यंत मान्यता वाढविण्यात यावी. गावातून दुसऱ्या ठिकाणी शिक्षणासाठी जात असताना छेडछाड होत होती. त्यामुळे रेवाडीतील सुमारे 80 विद्यार्थीनी उपोषणाला बसल्या होत्या.

रेवाडी - शाळेची मान्यता बारावीपर्यंत वाढविण्यासाठी गेल्या आठवड्यापासून उपोषणाला बसलेल्या विद्यार्थिनींच्या लढ्याला अखेर यश आले आहे. मनोहरलाल खट्टर यांच्या नेतृत्वाखाली हरियाना सरकारने विद्यार्थिनींच्या मागण्या मान्य केल्या आहेत.

'बेटी बचाओ, बेटी पढाओ' असा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नारा दिला असताना हरियानात शाळेची मान्यता वाढविण्यासाठी विद्यार्थिनींना चक्क आठवडाभर उपोषण करावे लागले. उपोषणाला बसलेल्या विद्यार्थिनींपैकी दहा मुलींची प्रकृती बिघडल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. अखेर मनोहरलाल खट्टर यांच्या नेतृ्त्वाखालील सरकारने या शाळेला बारावीपर्यंत मान्यता देण्याचा निर्णय घेतला आहे. खट्टर यांनी प्रशासनाला याबाबतचे आदेश दिले आहेत.

या विद्यार्थिनीची मागणी होती, की गावातील आमच्या शाळेची बारावीपर्यंत मान्यता वाढविण्यात यावी. गावातून दुसऱ्या ठिकाणी शिक्षणासाठी जात असताना छेडछाड होत होती. त्यामुळे रेवाडीतील सुमारे 80 विद्यार्थीनी उपोषणाला बसल्या होत्या. हरियानाच्या शिक्षणमंत्र्यांनी याबाबतची अधिकृत घोषणा केली आहे. 

Web Title: big win for rewari girls protesting for their education in haryana