बिहारचे राज्यपाल कोविंद 'एनडीए'चे राष्ट्रपतीपदाचे उमेदवार

वृत्तसंस्था
सोमवार, 19 जून 2017

केंद्र सरकारमध्ये सहभागी असलेल्या सर्व घटक पक्षांना रामनाथ कोविंद यांच्या नावाची माहिती देण्यात आली आहे. कोविंद हे मुळचे उत्तर प्रदेशातील कानपूरचे रहिवाशी आहेत. काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्याशीही राष्ट्रपतीपदाच्या नावाबाबत चर्चा केली आहे.

नवी दिल्ली - बिहारचे राज्यपाल रामनाथ कोविंद हे राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे (एनडीए) राष्ट्रपतीपदाचे उमेदवार असतील, अशी घोषणा भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी आज (सोमवार) केली.

भाजपच्या संसदीय समितीची आज (सोमवार) बैठक झाली. पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा यांच्यासह केंद्रीय मंत्री या बैठकीला उपस्थित होते. या बैठकीनंतर पत्रकार परिषद घेत अमित शहा यांनी सर्वांच्या सहमतीने 71 वर्षीय रामनाथ कोविंद यांच्या नावाची घोषणा केल्याचे सांगितले. राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत अनेक मोठ्या नेत्यांची नावे चर्चेत होती. मात्र, बिहारच्या राज्यपालांना एनडीए सरकारकडून संधी देण्यात आली आहे.

अमित शहा म्हणाले, की केंद्र सरकारमध्ये सहभागी असलेल्या सर्व घटक पक्षांना रामनाथ कोविंद यांच्या नावाची माहिती देण्यात आली आहे. कोविंद हे मुळचे उत्तर प्रदेशातील कानपूरचे रहिवाशी आहेत. काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्याशीही राष्ट्रपतीपदाच्या नावाबाबत चर्चा केली आहे. पक्षाच्या अनेक समित्यांमध्ये त्यांनी काम केले आहे. दलितांसाठी ते कायम संघर्ष करत आले आहेत. त्यांनी अनेक महत्त्वाची पदे पार पाडली आहेत. शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी नाव समजल्यानंतर कळवू, असे सांगितले होते. दलित समाजातून संघर्ष करून ते पुढे आले आहेत.

राष्ट्रपती निवडणुकीसाठी मतांची स्थिती अशी आहेः

  • देशभरातील एकूण खासदार 776, आमदार 4,120
  • खासदारांच्या मतांचे एकूण मूल्य 5,49,408
  • आमदारांच्या मतांचे एकूण मूल्य 5,49,474
  • खासदार-आमदारांच्या मतांचे एकत्रित मूल्य 10,98,882
  • विजयासाठी उमेदवाराला हवीत 5,49,442 मते
  • एनडीएकडे सध्याची मते आहेत 5,37,614
  • विरोधकांकडे सध्याची मते आहेत 4,2,230
  • अन्य लहान पक्षांकडे मिळून मते आहे 1,59,038
  • एनडीला विजयासाठी हवीत जादा 11,828 मते