बिहारला पाचशे कोटींचे पॅकेज: मोदींनी केली पूरग्रस्त भागाची हवाई पाहणी

वृत्तसंस्था
रविवार, 27 ऑगस्ट 2017

पूर्णिया (बिहार) : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज बिहारच्या पूरग्रस्त सीमांचल भागाची हवाई पाहणी केली. यावेळी मोदींसोबत मुख्यमंत्री नितीशकुमार, उपमुख्यमंत्री सुशीलकुमार मोदीदेखील उपस्थित होते. हवाई पाहणीनंतर येथील हवाई दलाच्या तळावर उतरलेल्या मोदींनी पूरस्थितीचा सविस्तर आढावा घेत राज्यासाठी पाचशे कोटी रुपयांच्या विशेष मदत पॅकेजची घोषणा केली.

""केंद्र सरकार राज्याला सर्वोतोपरी मदत करेल, लवकरच केंद्रीय पथक बिहारला भेट देत परिस्थितीची पाहणी करणार आहे,'' असेही मोदी यांनी सांगितले. यानंतर मोदी थेट दिल्लीला रवाना झाले. पंतप्रधानांनी आज सीमांचलमधील पूर्णिया, अररिया, कटिहार, किशनगंज या भागांची तब्बल 50 मिनिटे हवाई पाहणी केली. पुरामध्ये मरण पावलेल्यांच्या नातेवाइकांना प्रत्येकी दोन लाख रुपयांचे अर्थसाहाय्य केले जाणार असल्याचे सांगत त्यांनी पंतप्रधान सहाय्यता निधीतून ही रक्कम दिली जाणार असल्याचे स्पष्ट केले, तसेच गंभीर जखमी झालेल्यांना 50 हजार रुपयांचे अनुदान देण्यात येईल, असेही स्पष्ट केले.

पंतप्रधानांची बैठक
पूरग्रस्त भागाच्या पाहणीनंतर पंतप्रधान मोदी यांनी एक उच्चस्तरीय बैठक घेतली. या बैठकीस मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, त्यांचे सहकारी आणि अन्य वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. यावेळी पंतप्रधानांनी विमा कंपन्यांनाही पूरग्रस्त भागातील नुकसानीचा नेमका आढावा घेण्यासाठी तातडीने आपले प्रतिनिधी पाठविण्याच्या सूचना केल्या आहेत. केंद्रीय दळणवळण मंत्रालयाने पायाभूत सुविधांचे नुकसान भरून काढण्यासाठी तातडीने उपाययोजना आखाव्यात, अशा सूचनाही त्यांनी दिल्या आहेत.

Web Title: bihar news bihar flood and central government fund bihar