मागास बिहारला शिक्षणाचा ध्यास

file photo
file photo

प्रत्येक एक किलोमीटरवर शाळा; उच्च शिक्षणासाठी विद्यार्थ्यांना क्रेडिट कार्ड

पाटणा: पटसंख्या कमी असलेल्या शाळा बंद करण्याचा निर्णय महाराष्ट्र सरकारने घेतला आहे. मात्र याउलट स्थिती बिहारमधील असून तेथे एक किलोमीटर अंतरावर प्राथमिक शाळा आहे. माध्यमिक शाळा तीन कि.मी.वर तर उच्च माध्यमिक शाळा प्रत्येक पाच किलोमीटरवर उभारण्यात आली आहे.

राज्यात शैक्षणिक क्षेत्र सक्षम करण्यासाठी बिहारमधील संयुक्त जनता दल व भाजप आघाडीच्या सरकारने शाळांची संख्या वाढविण्याचा निर्णय घेतला असून तो अंमलातही आणला आहे. बिहार विधानसभेत याबाबतची माहिती शिक्षण मंत्र्याचा तात्पुरता कार्यभार सांभाळणारे श्रावण कुमार यांनी शुक्रवारी (ता.9) दिली. ""प्रत्येक ग्रामपंचायतीच्या ठिकाणी उच्च माध्यमिक शाळा उभारण्याच्या उद्दिष्टपूर्तीच्या दिशेने राज्य सरकारची वाटचाल सुरू आहे, असे सांगून कुमार म्हणाले एकूण आठ हजार 391 ग्रामपंचायतींपैकी पाच हजार 59 ग्रामपंचायतींमध्ये माध्यमिक शाळा आहेत, तर दोन हजार 200 ग्रामपंचायतींमध्ये उच्च माध्यमिक शाळा आहेत.

शिक्षण खात्याच्या अर्थसंकल्पीय तरतुदीवर चर्चा करताना कुमार बोलत होते. 2018-2019 या वर्षात शिक्षणासाठी 32,125.63 कोटी रुपयांची तरतूद केली आहे. मात्र, याबाबात असमाधान व्यक्त करीत विरोधी पक्षांच्या सदस्यांनी सभात्याग केला. त्यानंतर आवाजी मतदानाने या तरतुदीला मंजुरी देण्यात आली. शाळा उभारणीसाठी जागा उपलब्ध करून देण्याचे नियमही सरकारने शिथिल केले आहेत. शाळेसाठी पूर्वी एक एकर जमीन असणे बंधनकारक होते. आता पाऊण एकर जागा असली तरी त्यावर शाळा बांधता येईल, असे शिक्षण मंत्र्यांनी सांगितले.

उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्येत वाढ होण्यासाठी बिहार सरकार उपाययोजना आखत आहे. उच्च शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्यांना आर्थिक अडचण भासू नये म्हणून विनासायास कर्ज उपलब्ध करण्यात येणार आहे. यासाठी "बिहार विद्यार्थी क्रेडिट कार्ड' त्यांना दिले जाणार आहे, असे कुमार यांनी सांगितले. विद्यार्थ्यांना कर्ज देण्यास बॅंका तयार नसतात, ही गोष्ट लक्षात घेऊन "बिहार राज्य शिक्षण वित्त महामंडळाची स्थापना करण्याची घोषणाही त्यांनी या वेळी केली. श्रावण कुमार सभागृहात ही माहिती देत असताना विरोधी पक्षांनी सभात्याग केला. शिक्षणमंत्री कृष्णप्रसाद वर्मा सभागृहात उपस्थित नसताना चर्चेत सहभागी होण्यात काहीच उपयोग नव्हता, अशी टिपण्णी राष्ट्रीय जनता दलाचे ज्येष्ठ नेते व माजी अर्थमंत्री अब्दुल बारी सिद्दिकी यांनी केली.

"राष्ट्रपती महात्मा गांधी'
बिहारच्या शैक्षणिक वाटचालीची माहिती देत असताना श्रावण कुमार यांनी महात्मा गांधी यांचा उल्लेख अनवधानाने "राष्ट्रपती महात्मा गांधी' असा केला. त्यावर मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी ही चूक कुमार यांच्या तत्काळ लक्षात आणून देत "राष्ट्रपती' नव्हे "राष्ट्रपिता महात्मी गांधी' अशी सुधारणा केली.

शिक्षणाचा मार्ग...
8,391
एकूण ग्रामपंचायती

5, 059
माध्यमिक शाळा असलेल्या ग्रामपंचायची

2200
उच्च माध्यमिक शाळा असलेल्या ग्रामपंचायती

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com