झारखंडचे माजी मुख्य सचिव सजल चक्रवर्ती दोषी

उज्ज्वलकुमार
मंगळवार, 14 नोव्हेंबर 2017

पाटणा: चारा गैरव्यवहारप्रकरणी "सीबीआय'च्या विशेष न्यायालयाने आज झारखंडचे माजी मुख्य सचिव व चाईबासाचे माजी उपायुक्त सजल चक्रवर्ती यांना आज दोषी ठरविले. येत्या 21 नोव्हेंबरला त्यांना शिक्षा सुनावण्यात येईल.

पाटणा: चारा गैरव्यवहारप्रकरणी "सीबीआय'च्या विशेष न्यायालयाने आज झारखंडचे माजी मुख्य सचिव व चाईबासाचे माजी उपायुक्त सजल चक्रवर्ती यांना आज दोषी ठरविले. येत्या 21 नोव्हेंबरला त्यांना शिक्षा सुनावण्यात येईल.

या प्रकरणातील अन्य आरोपी माजी मुख्यमंत्री लालूप्रसाद यादव, जगन्नाथ मिश्रा यांच्यासह 32 जणांबाबतही विशेष न्यायालय लवकरच निर्णय देईल, असे मानले जाते. बिहारमध्ये गाजलेल्या चारा गैरव्यवहारावेळी चाईबासा येथील कोषागारातून सुमारे 38 कोटी रुपये बेकायदा काढण्यात आले होते. या प्रकरणी "सीबीआय'ने चक्रवर्ती यांना आरोपी केले होते. उपायुक्त असतानाही त्यांनी कोषागारावर नियंत्रण ठेवले नाही, असा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला होता. त्यांच्या काळातच या कोषागारातून मोठ्या प्रमाणात रक्कम अवैधरीत्या काढण्यात आली.

चारा गैरव्यवहारप्रकरणी "सीबीआय'च्या विशेष न्यायालयाने लालूप्रसाद यादव, मिश्रा यांच्यासह 32 जणांना हजर राहण्याचे आदेश दिले होते. सर्व युक्तिवाद पूर्ण झाल्यानंतर या आरोपींना बचावाची संधी दिली जाणार आहे. नव्वदच्या दशकात 1995 मध्ये बिहारमध्ये 950 कोटींचा चारा गैरव्यवहार समोर आला होता. बिहार व झारखंडच्या वेगवेगळ्या जिल्हा कोषागारांतून अवैधरीत्या रक्कम काढण्यात आली होती. यातील एका प्रकरणात लालूप्रसाद यादव यांना पाच वर्षांची शिक्षा आधीच झालेली आहे.

Web Title: bihar news Jharkhand's former Chief Secretary Sajal Chakraborty convicted