'जेडीयू'चा आतला आवाज नितीश कुमारांसोबत नाही; शपथविधीत ऐनवेळी बदल

वृत्तसंस्था
गुरुवार, 27 जुलै 2017

पक्षातून होणाऱ्या या विरोधामुळे जनता दलाने नितीश कुमार यांच्या शपथविधी समारंभाच्या वेळेतही अचानक बदल केला असल्याचे सांगण्यात आले.

पाटणा : बिहारमधील महाआघाडीतून बाहेर पडल्यानंतर लगेच भारतीय जनता पक्षासोबत हातमिळवणी करत राज्यात पुन्हा सरकार स्थापन करण्याचा निर्णय नितीश कुमार यांनी तडकाफडकी घेतल्याने त्यांच्या पक्षाचे नेते नाराज झाले आहेत. यामुळे शपथविधी समारंभही संध्याकाळऐवजी सकाळीच उरकण्यात येणार आहे. 

संयुक्त जनता दलाचे (जेडीयू) खासदार अली अन्वर यांनी भाजपसोबत सत्ता स्थापन करण्याच्या या निर्णयाला जाहीरपणे विरोध दर्शवला आहे. 
अली अन्वर म्हणाले की, "माझा अंतरात्मा नितीश कुमार यांच्या या निर्णयाचे समर्थन करत नाही. मी पक्षाच्या बैठकीत या मुद्द्यावर माझी म्हणणे मांडणार आहे."

पक्षातून होणाऱ्या या विरोधामुळे जनता दलाने नितीश कुमार यांच्या शपथविधी समारंभाच्या वेळेतही अचानक बदल केला असल्याचे सांगण्यात आले. संध्याकाळी पाच वाजता शपथविधी घेण्याचे नियोजन करण्यात आले होते. मात्र, तो सकाळी दहा वाजता उरकण्याचा निर्णय घेण्यात आला. 

ई सकाळवरील ताज्या बातम्यांसाठी क्लिक करा: