नितीशकुमारांनी विश्‍वासदर्शक ठराव जिंकला

nitishkumar
nitishkumar

गुप्त मतदानाची मागणी विधानसभाध्यक्षांनी फेटाळली

पाटणा: सलग सहाव्यांदा बिहारच्या मुख्यमंत्रिपदी विराजमान होणाऱ्या नितीशकुमार यांनी आज विश्‍वासदर्शक ठराव जिंकत भाजपच्या साथीने मिळवलेले सिंहासन आणखी मजबूत केले. या मतदानात सत्ताधारी राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या (एनडीए) बाजूने 131 मते पडली, तर विरोधी पक्षांना 108 मतांवरच समाधान मानावे लागले. या वेळी विरोधकांनी केलेली गुप्त मतदानाची मागणी विधानसभाध्यक्षांनी फेटाळून लावत सभागृहामध्ये सदस्यांना उभे करून मत मोजणी केली.

या वेळी सभागृहामध्ये बोलताना विरोधी पक्षनेते तेजस्वी यादव यांनी सरकारवर आमदारांच्या अपहरणाचा आरोप केला. सभागृहामध्ये गुप्त मतदान घेण्यात आले असते तर निकाल वेगळा लागला असता, असे ते म्हणाले. राज्य सरकार आणि भाजपची बाजू मांडताना उपमुख्यमंत्री सुशीलकुमार मोदी यांनी भ्रष्टाचारामुळे राष्ट्रीय जनता दलास हा दिवस पाहण्याची वेळ आल्याचे सांगितले. मुख्यमंत्री नितीशकुमार यांनीही आपल्या भाषणामध्ये राष्ट्रीय जनता दलाचा समाचार घेतला. जातीयवादाचा मुद्दा पुढे करत भ्रष्टाचाराशी केली जाणारी हातमिळवणी आम्ही कधीही सहन करणार नाही, असे त्यांनी निक्षुन सांगितले.

चौघांनी मतदान केले नाही
बिहारच्या 243 सदस्यीय विधिमंडळातील चार सदस्यांनी आज मतदान केले नाही. त्यामुळे मतदान करणाऱ्या सदस्यांची संख्या 239 एवढी होती. राष्ट्रीय जनता दलाचे नेते रावभल्लव यादव हे तुरुंगात असल्याने त्यांना मतदान करता आले नाही, तर भाजपचे आनंद शंकर पांडे हे शस्त्रक्रियेमुळे सभागृहात उपस्थित राहू शकले नाहीत. काही कारणांमुळे सभागृहाच्या बाहेर अडकून पडलेले कॉंग्रेस नेते सुदर्शन हेदेखील मतदानापासून दूर राहिले, तर विधानसभाध्यक्ष विजयकुमार चौधरी यांनीही मतदानात सहभाग घेतला नाही. मुख्यमंत्री नितीशकुमार आणि उपमुख्यमंत्री सुशीलकुमार मोदी हे दोघेही विधान परिषदेचे सदस्य असल्याने त्यांनी मतदानात भाग घेतला नाही; पण ते सभागृहामध्ये मात्र उपस्थित होते.

बिहारमधील लोकांनी सेवेसाठी जनादेश दिला होता, राज "भोग' घेण्यासाठी निवडून दिले नव्हते.
- नितीशकुमार, मुख्यमंत्री बिहार

राज्यातील जनतेने महाआघाडीच्या बाजूने कौल दिला होता. नितीश यांनी तो कौल झुगारून बिहारचा अवमान केला आहे.
- तेजस्वी यादव, विरोधी पक्ष नेते

विश्‍वासदर्शक ठरावाचे समीकरण
243... विधानसभेतील संख्याबळ
120... बहुमतासाठी आवश्‍यक संख्याबळ
131... "एनडीए'च्या बाजूने
108... विरोधकांच्या बाजूने पडलेली मते
4... सदस्यांनी मतदान केले नाही

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com