तेजस्वी यादव उपमुख्यमंत्री कायम राहणार

वृत्तसंस्था
मंगळवार, 11 जुलै 2017

राजद आमदारांचा निर्धार; अफवांवर विश्‍वास न ठेवण्याचे लालूंचे आवाहन

पाटणा : बिहारचे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव हे पद सोडणार नाहीत, असा निर्णय आज राष्ट्रीय जनता दलाच्या बैठकीत घेण्यात आला. बेहिशेबी मालमत्ताप्रकरणी राजदचे अध्यक्ष लालूप्रसाद यादव यांच्या घरी सीबीआयने छापे घातल्यानंतर तेजस्वी यादव यांच्या राजीनाम्याच्या मागणीने जोर धरलेला असताना या पार्श्‍वभूमीवर बोलावलेल्या पक्षाच्या बैठकीत तेजस्वी यादव यांच्यासंबंधी निर्णय जाहीर करण्यात आला. दरम्यान, उद्या मुख्यमंत्री नितीशकुमारदेखील जेडीयू आमदारांसमवेत आणि खासदारांसमवेत बैठक बोलावण्याची शक्‍यता आहे.

राजदचे लालूप्रसाद यादव यांनी बैठकीत सांगितले की, ज्या गैरव्यवहाराची चर्चा होत आहे, तेव्हा राबडीदेवी मुख्यमंत्री नव्हत्या आणि तेजस्वी यादव 13 वर्षांचे होते. त्यामुळे तेजस्वी यांच्या सहभागाचा प्रश्‍नच उद्‌भवत नाही. बैठकीनंतर लालू यादव यांनी सर्व आमदारांना एक-एक मिनीट भेटण्याची इच्छा व्यक्त केली. या वेळी त्यांनी आमदारांना मोर्चासाठी मोठी गर्दी हवी आहे, असे सांगत कोणत्याही प्रकारच्या अफवांकडे लक्ष देऊ नका, असे सांगितले.

तसेच वरिष्ठ नेते आणि मंत्री अब्दुल बारी सिद्दीकी म्हणाले की, सीबीआय छाप्याच्या माध्यमातून भाजप बिहारचे सरकार अस्थिर करण्याचा प्रयत्न करत आहे. तेजस्वी यादव राजीनामा देणार नसून, आम्ही त्यांच्यासमवेत आहोत, असे सिद्दीकी यांनी स्पष्ट केले. जो भाजपच्या विरोधात उभा राहील, त्याला लक्ष्य केले जात असल्याचा आरोपही त्यांनी केला. काही दिवसांपूर्वी सीबीआयने लालूप्रसाद यादव आणि त्यांच्या नातेवाइकांच्या निवासस्थानी छापे घातले होते. 2006 मध्ये तत्कालीन रेल्वेमंत्री लालूप्रसाद यादव यांनी रेल्वेच्या दोन हॉटेलच्या प्रकरणात अनियमितता आढळून आली आणि त्याचा लाभही घेतला गेला, असे सीबीआयचे म्हणणे आहे. सीबीआयचे छापासत्र सुरू असताना मात्र मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी यासंदर्भात कोणतेही मत व्यक्त केले नाही. ते काही दिवसांपासून आजारी असल्याने राजगीर येथे आराम करत असल्याचे सांगितले गेले. मात्र आता ते पाटण्याला परतले असले तरी अद्याप त्यांनी मौन सोडले नाही. यासंदर्भात पत्रकारांनी प्रश्‍न उपस्थित केले तेव्हा पक्षाचे नेते जगदानंद सिंह यांनी नितीशकुमार यांनी रविवारी रात्री लालूप्रसाद यादव यांच्याशी फोनवरून चर्चा केल्याचे सांगितले. तेजस्वी यादव यांचे नाव सीबीआयच्या एफआयआरमध्ये आल्याने त्यांनी पदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी विरोधकांकडून केली जात आहे.