बिल्कीस बानो बलात्कार प्रकरणी 11 जणांची जन्मठेप कायम

वृत्तसंस्था
गुरुवार, 4 मे 2017

गोध्रा दंगलीनंतर ही घटना घडली. हा खटला अहमदाबाद येथील सत्र न्यायालयात सुरू झाला. मात्र, आरोपी साक्षीदारांवर दबाव आणण्याचा प्रयत्न करू शकतात, त्यामुळे हा खटला दुसऱ्या राज्यात वर्ग करण्याची विनंती सीबीआयने केली होती. त्यावरून सर्वोच्च न्यायालयाने 2004 मध्ये हा खटला मुंबई न्यायालयात वर्ग केला. 

मुंबई : बिल्कीस बानोवरील सामूहिक बलात्कार आणि तिच्या कुटुंबीयांची हत्या केल्याप्रकरणी सत्र न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा ठोठावलेल्या अकराजणांची जन्मठेपेची शिक्षा कायम ठेवली आहे. तसेच, पाच पोलिस अधिकाऱ्यांनाही याप्रकरणी दोषी ठरविले आहे.

या 2002च्या प्रकरणातील अकरा आरोपींनी सत्र न्यायालयाच्या निर्णयाविरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. दरम्यान, या सर्व दोषी सिद्ध झालेल्या आरोपींना फाशीची शिक्षा देण्यात यावी अशी याचिका सीबीआयने दाखल केली होती. सुनावणीदरम्यान तीनजणांच्या फाशीची मागणी उच्च न्यायालयाने फेटाळली आहे. न्या. व्ही. के. ताहिलरमाणी यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठापुढे ही सुनावणी झाली. 
 
गोध्रा दंगलीनंतर ही घटना घडली. हा खटला अहमदाबाद येथील सत्र न्यायालयात सुरू झाला. मात्र, आरोपी साक्षीदारांवर दबाव आणण्याचा प्रयत्न करू शकतात, त्यामुळे हा खटला दुसऱ्या राज्यात वर्ग करण्याची विनंती सीबीआयने केली होती. त्यावरून सर्वोच्च न्यायालयाने 2004 मध्ये हा खटला मुंबई न्यायालयात वर्ग केला. 

जसवंत नाई, गोविंद नाई, शैलेश भट, राधेशाम शहा, बिपीनचंद्र जोशी, केसरभाई वोहनिया, प्रदीप मोरधिया, बाकाभाई वोहनिया, राजूभाई सोनी, मितेश भट आणि रमेश चंदन यांना सामूहिक बलात्कार व हत्येबद्दल मुंबईच्या सत्र न्यायालयाने जानेवारी 2008 मध्ये जन्मठेपेची शिक्षा ठोठावली होती. त्यांनी या निर्णयाविरुद्ध उच्च न्यायालयात धाव घेतली होती. 

दरम्यान, गुन्हा लक्षात घेता सत्र न्यायालयाने आरोपींना ठोठावलेली शिक्षा कमी आहे, असे सीबीआयचे म्हणणे होते. या दोन्ही बाजूंच्या याचिकेवरील सुनावणीवेळी खंडपीठाने सीबीआय व दोषींची बाजू ऐकली. त्यावरील निकाल १ डिसेंबर २०१६ रोजी राखून ठेवला होता.

आरोपींनी 3 मार्च 2002 रोजी या राधिकापूर येथे बिल्कीस बानोच्या कुटुंबीयांवर हल्ला केला. तिच्या कुटुंबीयांची हत्या करण्यात आली. तसेच, बिल्कीसवर सामूहिक बलात्कार केला. त्यावेळी ती पाच महिन्यांची गर्भवती होती.  बिल्कीस हिच्या घरातील सहा सदस्य मारेकऱ्यांच्या ताब्यातून सुटले, असे सीबीआयने सांगितले. 

Web Title: Bilkis Bano gangrape convicts life term upheld by bombay high court