भाजपच्या यादीत आयाराम-गयारामांची उपस्थिती

BJP
BJP

नवी दिल्ली : हिमाचल प्रदेश निवडणुकीसाठी गेले आठवडाभर प्रतीक्षेत असलेली भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांची यादी आज (ता. 18) दुपारनंतर गुपचूप जारी करण्यात आली. प्रस्थापित भाजप नेते व नरेंद्र मोदी-अमित शहा यांचा "चॉइस' यातील जोरदार रस्सीखेच भाजप यादीतून दिसत आहे. नव्या चेहऱ्यांना 25 ते 30 टक्के इतक्‍या प्रमाणात संधी देण्याचे भाजप नेतृत्वाचे धोरण असले, तरी आयाराम-गयाराम यांची उपस्थिती ही यादीतील ठळक बाब ठरली आहे. 

या पर्वतीय राज्यात नऊ नोव्हेंबरला एकाच टप्प्यात मतदान होणार आहे. भाजपने राज्यातील 68 उमेदवारांची नावे जाहीर केली असून, त्यात सात महिला आहेत; मात्र वादगस्त नेते सुखराम यांच्या मुलासह कॉंग्रेसमधून उड्या मारून आलेल्या सुमारे दहा जणांनाही तिकिटाची लॉटरी देणे भाजप नेतृत्वाला भाग पडले आहे. 

हिमाचल प्रदेशात यंदा भाजपला अनुकूल वातावरण आहे; मात्र नोटाबंदी व जीएसटीनंतर राज्यातील वीरभद्रसिंह सरकारसाठी हवा अनुकूलतेकडे झुकू लागली होती. त्यामुळे भाजप नेतृत्वाने यादी जाहीर करण्यासाठी कॉंग्रेसी पद्धतीने विलंब केला. या राज्यात माजी मुख्यमंत्री प्रेमकुमार धुमल, शांताकुमार व मोदी-शहा यांच्या दृष्टीने मुख्यमंत्रिपदाचे दावेदार केंद्रीय मंत्री जे. पी. नड्डा यांचे गट बलवान आहेत. धुमल यांचे पुत्र अनुराग ठाकूर यांना मोदींनी मंत्री न केल्याने ते नाराज असल्याचे सांगितले जात होते. या राज्यात प्रस्थापित दोन्ही गटांनी आपापल्या याद्या पुढे केल्या होत्या. मागच्या आठवड्यात केंद्रीय निवडणूक समितीच्या बैठकीत तिन्ही याद्यांची छाननी केल्यावर एक अंतिम उमेदवार यादी बनविली गेली; मात्र ही यादी मंजुरीसाठी मोदींकडे पोचल्यावर त्यांनी यात युवा चेहरे किती, असा सवाल केला होता. धुमल यांना रातोरात दिल्लीला बोलावून मोदी-शहा यांनी त्यांच्याशी खलबते केली. त्यानंतर दोनदा यादी बदलण्यात आल्याचे समजते. धुमल यांना त्यांच्या हमीरपूरमधून हलवून सुजानपूरमधून उमेदवारी देण्यात आली आहे. हमीरपूरमध्ये आमदार नरेंद्र ठाकूर यांना उमेदवारी दिली आहे. मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करावा, ही त्यांची मागणी पक्षनेतृत्वाने मान्य केलेली नाही. 

कॉंग्रेसने वीरभद्रसिंह यांचा चेहरा आधीच पुढे केला आहे. भाजपच्या यादीत यापूर्वीच्या धुमल सरकारमधील सात मंत्र्यांचा समावेश आहे. तीन दिवसांपूर्वी कॉंग्रेसमधून आलेले अनिल शर्मा यांना मंडीसारखी महत्त्वाची जागा देणे भाजप नेतृत्वाला भाग पडल्याचे दिसते. गेल्या 2012 मध्ये भाजपला 26 जागांवर समाधान मानावे लागले होते. तो आकडा यंदा बरोबर उलटा म्हणजे 62 व्हावा या दृष्टीने राज्याच्या नेत्यांना आदेश देण्यात आले आहेत. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com