कुमारस्वामी गर्विष्ठ व निरंकुश येडियुरप्पा यांचा आरोप; कॉंग्रेसवर विश्वास नाही 

वृत्तसंस्था
शुक्रवार, 25 मे 2018

कर्नाटकचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामी यांचे वर्तन गर्विष्ठ व निरंकुश प्रकारचे असून, त्यांचा कॉंग्रेस पक्षावर काडीचा विश्वास नसल्याचा दावा भाजपचे प्रदेशाध्यक्ष बी. एस. येडियुरप्पा यांनी आज पत्रकार परिषदेत केला. 
 

बंगळूर -  कर्नाटकचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामी यांचे वर्तन गर्विष्ठ व निरंकुश प्रकारचे असून, त्यांचा कॉंग्रेस पक्षावर काडीचा विश्वास नसल्याचा दावा भाजपचे प्रदेशाध्यक्ष बी. एस. येडियुरप्पा यांनी आज पत्रकार परिषदेत केला. 

कॉंग्रेसचे उपमुख्यमंत्री जी. परमेश्वरा यांना पत्रकार परिषदेत बोलण्याची संधी न दिल्याच्या मुद्द्यावर बोलताना येडियुरप्पा म्हणाले, ""कुमारस्वामी यांच्यात मित्रपक्षाशी मिळतेजुळते घेण्याची भावना कमी असल्याचे सदर प्रकारावरून प्रतित होते. त्यांच्या निरंकुश वर्तनामुळे हे सिद्ध झाले आहे, की कॉंग्रेसवर त्यांचा अजिबात विश्वास नाही.'' जनता अशा माणसाकडून काय अपेक्षा ठेवणार, असा प्रश्न येडियुरप्पा यांनी या वेळी उपस्थित केला. ते म्हणाले, ""जी. परमेश्वरा यांच्यासारख्या शांत राजकीय नेत्यासोबत कुमारस्वामी यांचा असा व्यवहार हा एकाअर्थी राजकीय समुदायाचा अपमान आहे.'' 

मुख्यमंत्री बनताच कुमारस्वामी यांनी लिंगायत समाजाचे पंडिताराध्य शिवाचार्य स्वामी यांना उद्देशून राजकारणात नाक खुपसू नका, अशी टिप्पणी केली होती. हा प्रकार अत्यंत दुर्दैवी आणि अनुचित असून, यामुळे कुमारस्वामी यांची संकुचित वृत्ती उघडी पडल्याचे येडियुरप्पा यांनी स्पष्ट केले. 

Web Title: BJP leader BS Yeddyurappa says CM Kumaraswamy does not trust the Congress