भाजप नेते तरुण विजय यांचे वर्णद्वेषी वक्तव्य

वृत्तसंस्था
शुक्रवार, 7 एप्रिल 2017

भारतीय जर वर्णद्वेषी असते तर त्यांनी तमिळनाडू, केरळ, कर्नाटक आणि आंध्र प्रदेशातील नागरिकांना जवळ केले नसते. आमच्या सर्व बाजूंना कृष्णवर्णीय नागरिक आहेत

नवी दिल्ली - दक्षिण भारतीय लोकांचा भारतीयांनी स्वीकार केला आहे. त्यामुळे भारतीयांना वर्णद्वेषी समजणे योग्य नाही, असे वादग्रस्त वक्तव्य भाजपचे नेते तरुण विजय यांनी केले आहे. मात्र, वादग्रस्त वक्तव्यानंतर तरुण विजय यांच्यावर टीका झाल्यानंतर त्यांनी दिलगिरी व्यक्त केली आहे.

दिल्ली जवळच्या उपनगरात नायजेरियातील व्यक्तींवर काही दिवसांपूर्वी हल्ला करण्यात आला होता. या विषयावर एका इंग्रजी वृत्तवाहिनीवरील चर्चेत बोलताना तरुण विजय यांनी संबंधित वक्तव्य केले होते. ""भारतीय जर वर्णद्वेषी असते तर त्यांनी तमिळनाडू, केरळ, कर्नाटक आणि आंध्र प्रदेशातील नागरिकांना जवळ केले नसते. आमच्या सर्व बाजूंना कृष्णवर्णीय नागरिक आहेत,'' असे विधान तरुण विजय यांनी केले होते. या वादग्रस्त विधानावर जोरदार टीका होऊ लागल्यामुळे तरुण विजय यांनी दिलगिरी व्यक्त केली.

"मी वापरलेले शब्द चुकीचे असून, त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो,'' अशा आशयाचे ट्‌विट तरुण विजय यांनी केले आहे. राज्यसभेचे माजी खासदार असलेले तरुण विजय हे भाजपचे नेते असून, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मुखपत्र असलेल्या "पांचजन्य' साप्ताहिकाचे ते माजी संपादक आहेत.