भाजप कार्यकारिणी बैठक आजपासून

सकाळ न्यूज नेटवर्क
शुक्रवार, 6 जानेवारी 2017

गरीब कल्याण कार्यक्रमाच्या अंमलबजावणीला राज्याराज्यांत जोर देणे, मुंबईतील घरांची योजना महापालिका निवडणूक आचारसंहिता लागण्याच्या आत घोषित करून शिवसेनेला चेकमेट करणे आदींबाबत विचारमंथन केले जाईल. आगामी अर्थसंकल्प हा शेतकरी व गरिबांसाठी सांताक्‍लॉजची पोतडी या स्वरूपात येण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.

नवी दिल्ली - केंद्रातील सत्तारूढ भारतीय जनता पक्षाची राष्ट्रीय कार्यकारिणी बैठक उद्यापासून दोन दिवस (ता. 6 व 7 जानेवारी) दिल्लीत होत असून, यात काळा पैसा व भ्रष्टाचारमुक्ती, नोटाबंदी आणि उत्तर प्रदेशासह पाच राज्यांतल्या निवडणुका याभोवतीच चर्चेचा झोत राहणार, हे पक्के आहे. विशेषतः "चलो यूपी'चा नारा देतानाच नोटाबंदीनंतरच्या दोन महिन्यांत प्रचंड हाल सहन करूनही सर्वसामान्यांनी दाखविलेला संयम व दुसरीकडे विरोधकांनी पाण्यात घातलेले संसद अधिवेशन यावर खास "नरेंद्र मोदी स्टाइल' घणाघाती वक्तव्य अपेक्षित आहे.

मोदी युग आल्यापासून भाजप कार्यकारिणी बैठका घटनेनुसार नेमाने होत असल्याचे पक्षनेत्यांचे निरीक्षण आहे. त्यानुसार उद्यापासून राजधानीतील एनडीएमसी सभागृहात ही बैठक होईल. आधीच्या नियोजनानुसार सात व आठ जानेवारीला प्रस्तावित असलेली ही बैठक पंतप्रधानांना प्रवासी भारतीय संमेलनानिमित्त येत्या रविवारी दिल्लीबाहेर जावे लागणार असल्याने एक दिवस अलीकडे आणल्याचे सूत्रांनी सांगितले. पंतप्रधान नरेंद्र मोदी दीड दिवस संपूर्णपणे बैठकीस हजर राहतील, असे सांगण्यात आले. आज रात्री पक्षाच्या महासचिवांची व उद्या कार्यालयप्रमुखांची बैठक होईल. पक्षाध्यक्ष अमित शहा हे उद्‌घाटनाचे, तर मोदी शनिवारी सायंकाळी समारोपाचे भाषण करतील. पक्षाचे संस्थापक लालकृष्ण अडवानी, संघटनमंत्री रामलाल, मुरलीमनोहर जोशी, माजी अध्यक्ष राजनाथ सिंह, व्येंकय्या नायडू, नितीन गडकरी, पक्षनेते अरुण जेटली, मनोहर पर्रीकर व देवेंद्र फडणवीस यांच्यासह पक्षाचे सर्व मुख्यमंत्री उपस्थित राहणार आहेत.

गरीब कल्याण कार्यक्रमाच्या अंमलबजावणीला राज्याराज्यांत जोर देणे, मुंबईतील घरांची योजना महापालिका निवडणूक आचारसंहिता लागण्याच्या आत घोषित करून शिवसेनेला चेकमेट करणे आदींबाबत विचारमंथन केले जाईल. आगामी अर्थसंकल्प हा शेतकरी व गरिबांसाठी सांताक्‍लॉजची पोतडी या स्वरूपात येण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. त्यामुळे आर्थिक ठरावांत गरीब कल्याण व अंत्योदय यावरच सरकार जोर देईल, असे दिसत आहे. राजकीय ठरावांत बंगालधील परिस्थिती व भाजप कार्यकर्त्यांविरुद्धची "तृणमूल'ची गुंडगिरी यावर टीकास्त्र सोडले जाईल. या बैठकीत आर्थिक व राजकीय असे दोन मुख्य ठराव मंजूर होतील.

झळा संपल्याचा दावा
एटीएममधील रकमेची मर्यादा वाढविल्यावर नोटाबंदीच्या झळा जवळपास संपल्याचे भाजपचे म्हणणे आहे. पंजाब, मणिपूरवगळता उत्तर प्रदेशासह तिन्ही राज्यांत भाजप स्वबळावरच लढणार आहे. त्यामुळे या ठिकाणी देशभरातील पदाधिकारी, केंद्रीय मंत्री, मुख्यमंत्री यांच्या जंगी सभांचे भरगच्च नियोजन तयार आहे.

Web Title: BJP Meeting starts today