कर्नाटकात भाजपला आशा 'विधानसभेच्या अध्यक्षपदाची'

वृत्तसंस्था
गुरुवार, 24 मे 2018

भाजपने आता विधानसभेच्या अध्यक्षपदासाठी दावा केला असून, सुरेश कुमार यांनी विधानसभेच्या अध्यक्षपदासाठी उमेदवारी अर्ज भरला आहे.

नवी दिल्ली : कर्नाटकात काँग्रेस-धर्मनिरपेक्ष जनता दलाचे (जेडीएस) सरकार अस्तित्वात आले असून, जेडीएस नेते एच. डी. कुमारस्वामी यांची मुख्यमंत्रिपदी निवड करण्यात आली. त्यांच्या या निवडीनंतर भाजपकडून आता विधानसभेच्या अध्यक्षपदासाठी दावा केला जात आहे. यासाठी भाजपचे आमदार सुरेश कुमार यांनी आज (गुरुवार) विधानसभेच्या अध्यक्षपदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केला. 

कर्नाटकात भाजप नेते बी. एस. येडियुरप्पा यांना बहुमत चाचणीपूर्वी पायउतार व्हावे लागले. त्यानंतर कुमारस्वामी कर्नाटकच्या मुख्यमंत्रिपदी विराजमान झाले. त्यांचा काल (बुधवार) शपथविधी सोहळा पार पडला. या सर्व राजकीय घडामोडीनंतर भाजपने आता विधानसभेच्या अध्यक्षपदासाठी दावा केला असून, सुरेश कुमार यांनी विधानसभेच्या अध्यक्षपदासाठी उमेदवारी अर्ज भरला आहे. यावेळी भाजप नेते सुनील आणि अश्वथ नारायण हे दोन्ही नेते उपस्थित होते. तर दुसरीकडे काँग्रेसनेही अध्यक्षपदासाठी दावा केला आहे. काँग्रेसकडून के. आर. रमेश कुमार यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. यावेळी नवनियुक्त उपमुख्यमंत्री जी. परमेश्वर आणि माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्यासह पक्षाचे अन्य नेते उपस्थित होते. 

दरम्यान, सत्ताधारी पक्षाच्या नेत्याला विधानसभेचे अध्यक्षपद दिले जाते. मात्र, कर्नाटकमध्ये भाजपने या पदासाठी केलेल्या दाव्यानंतर कर्नाटकात काय राजकीय घडामोडी होतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Web Title: BJP MLA Suresh Kumar Files Nomination For Karnataka Vidhana Soudha Speaker