भाजपच्या बैठकीची ओडिशात जय्यत तयारी

स्मृती सागरिका कानुनगो
शनिवार, 15 एप्रिल 2017

भुवनेश्‍वर : येथे भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीची जोरदार तयारी सुरू असून, पक्षाचे अध्यक्ष अमित शहा यांचे आज हजारो कार्यकर्त्यांनी मोठ्या जल्लोषात स्वागत केले. या बैठकीच्या निमित्ताने शहा हे तीन दिवस भुवनेश्‍वरमध्ये तळ ठोकून असतील. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 126 व्या जयंतीनिमित्त राज्य सचिवालयामध्ये आज विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते, या वेळी शहांनी डॉ. आंबेडकरांच्या पुतळ्याला पुष्पहार घालून अभिवादन केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे उद्या (ता. 15) ओडिशाला रवाना होतील. 

ज्या ठिकाणी राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक होणार आहे, त्या सभामंडपाला दलित कवी भीमा भोई यांचे नाव देण्यात आले आहे. काही उत्साही कार्यकर्त्यांनी शहा यांचे कमळांच्या फुलांचे दोन पुष्पहार घालून स्वागत केले. यातील एका हारामध्ये 21 कमळाची फुले, तर दुसऱ्यामध्ये 147 कळ्यांचा समावेश होता. यातील 21 फुले हे राज्यातील लोकसभेच्या जागा, तर 147 कळ्या विधानसभेच्या जागा दर्शवितात, असे एका कार्यकर्त्याने सांगितले.

राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीनंतर पंतप्रधान मोदी यांची सभा आणि रोड शोचेही आयोजन करण्यात आले आहे. मध्यंतरी राज्यामध्ये झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत भाजपने चारशेपैकी तीनशे जागा मिळवल्याने भाजप दुसऱ्या क्रमांकावर पोचला होता. कॉंग्रेसला मात्र शंभर जागांसह तिसऱ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले होते. आता हेच यश विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीमध्ये मिळवण्यासाठी भाजपने कंबर कसली आहे. 

दलित मतपेढीवर डोळा 
ओडिशात विधानसभेच्या 147 जागा आहेत. त्यातील 23 या अनुसूचित जातींसाठी राखीव असून, लोकसभेच्या 21 जागांपैकी 3 जागा या राखीव आहेत. मागील विधानसभेच्या निवडणुकीमध्ये भाजपचे दोन उमेदवार विजयी झाले होते. ते दोघेही दलित आहेत. पूर्वी दलित ही कॉंग्रेसची हक्काची मतपेढी म्हणून ओळखले जात, आता तो जनाधार बिजू जनता दलाकडे झुकला आहे. ही मते आपल्याकडे वळविण्यासाठी भाजपचे प्रयत्न सुरू आहेत. भाजपने आपल्या 'लूक ईस्ट' धोरणाला अधिक बळकट करण्यासाठीच ओडिशामध्ये राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीचा घाट घातल्याचे बोलले जाते.