धडपड सगळी लोकसभेसाठी ....

political_flags.jpg
political_flags.jpg

२०१९ जवळ येत चालले आहे, तशा राजकीय पक्षांच्या हालचाली अधिक वाढल्या आहेत. राज्याच्या राजकारणात प्रमुख चार पक्षांची स्वत:ची निश्चित अशी ताकद आहे. प्रत्येकाचे स्वत:चे प्रभावक्षेत्र आहे. परंतु, १९९५ पासूनच्या एकाही निवडणुकीत काेणत्याही एका पक्षावर जनतेने संपूर्ण विश्वास दाखवलेला नाही. म्हणूनच युती किंवा आघाडी ही सत्ता मिळवण्यासाठी पूर्वअट बनली आहे. वैचारिकभूमिका मिळत्या जुळत्या आहेत की नाही  याच्या फंद्यात न पडता त्यातल्या त्यात सोईच्या पक्षांना सोबतीला घेऊन सत्ता स्थापन करण्याची पद्धत सुरू आहे. कोणताही पक्ष सध्या तरी स्वबळावर लढण्यासाठी उत्सुक दिसत नाही. सर्वांचे लक्ष्य आहे ते सर्वाधिक आमदार निवडून आणत क्रमांक एकचा पक्ष बनण्याचे. ज्यांचे आमदार जास्त त्याचा मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळातही त्यांचेच वर्चस्व असा सरळ व्यवहार यामागे आहे

शिवसेनेशी युती भाजपसाठी महत्वाची 

सत्तास्थापनेनंतर सतत शिवसेनेसोबत सापत्नभावाने वागणाऱ्या भाजपने अकस्मात युतीची जाहीर भाषा सुरू केल्याने सामान्य शिवसैनिक संभ्रमात पडल्याचे चित्र आहे. भाजपचे हे युतीप्रेम केवळ "गुगली' असल्याची भावना शिवसेना नेते व शिवसैनिक व्यक्‍त करत असून, या वेळी भाजपच्या डावपेचाला बळी पडणार नसल्याचे संकेत शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी नेत्यांना दिले आहेत. प्रत्येक मतदारसंघात शिवसेना पदाधिकाऱ्यांना युतीबाबत कोणत्याही संभ्रमात राहू नका असा संदेश दिला आहे. भाजपच्या युतीबाबतच्या भूमिकेने शिवसेनेच्या नेत्यांमध्ये तर्कवितर्क सुरू आहेत. राज्यात स्थानिक पातळीवर शिवसैनिक व भाजप कार्यकर्त्यांमध्ये संघर्ष सुरू आहे. हे दोन्ही मित्रपक्षांचे स्थानिक कार्यकर्ते परस्परांना नंबर एकचे शत्रू मानत असताना युतीचा निर्णय झाला, तर अनेक शिवसैनिक फारकत घेत बंड करतील, अथवा इतर पक्षांचा पर्याय निवडतील, असेही काही शिवसेना नेत्यांचे मत आहे.

मोदींना पुन्हा पंतप्रधान करण्यासाठी राज्यातील भाजपच्या नेत्यांनी जोरदार तयारी सुरु केली आहे. कारण एकदा लोकसभा निवडणूक जिंकली की मग उद्या विधानसभा स्वबळावर लढूनही सर्वाधिक जागा आपल्याच येणार असा भाजपचा अंदाज आहे. लोकसभेसाठी आपली साथ घेतील आणि विधानसभेला वाऱ्यावर सोडतील. विधानसभेत भाजपाला आपल्यापेक्षा अधिक जागा मिळाल्या तर पुन्हा मुख्यमंत्री त्याच पक्षाचा असेल. आपल्याला परत एकदा पडती भूमिका घेऊन शांत राहावे लागेल ही खरी सध्याच्या घडीला शिवसेनेची मुख्य अडचण आहे. आधी लोकसभेचे जागावाटप करू, मग विधानसभेची बोलणी करू ही भूमिका भाजपची असेल असे घरहित धरून शिवसेना दोन्ही विधानसभा आणि लोकसभेसाठी जागा वाटप एकत्र करा यासाठी आग्रही असणार. लोकसभेला शिवसेना भाजप युती होऊ शकते. कारण, गेल्यावेळच्या जागा वाटपाचा फॉर्म्युला तयार आहे. काही जागांची अदलाबदल होऊ शकेल. युतीमध्ये वादळ येईल ते विधानसभेच्या जागा वाटपावेळी. युतीचे किमान ३०-३५ आमदार असे आहेत की जे भाजपा वा शिवसेनेच्या २०१४ मध्ये असलेल्या आमदारांना पराभूत करून जिंकले होते. नागपूर, नाशिक, पुणे ही अशी काही शहरे आहेत जिथे भाजपाने सर्वच्या सर्व जागा जिंकल्या होत्या. तेथील तिढा सोडवताना दमछाक होईल.त्यामुळे लोकसभेत युती आणि विधानसभेत स्वबळावर असेच पुन्हा एकदा होण्याची शक्यता आहे. 

काँग्रेस- राष्ट्रवादी एकत्र लढण्याची शक्यता 

काँग्रेस-राष्ट्रवादी हे युतीपेक्षा मनाने आजतरी एकमेकांच्या जवळ गेलेले आहेत. मोदींविरोधी केंद्रातील राजकारणाचे नेतृत्व शरद पवार करू पाहत आहेत. त्यामुळे दोघे एकत्रितपणे निवडणूक लढण्यात फार अडचण दिसत नाही. राष्ट्रवादी’ हल्लाबोल’ करते आहे. विदर्भ, खान्देश, मराठवाड्यात हल्लाबोल करून झाल्यानंतर ‘राष्ट्रवादी’ स्वत:च्या बालेकिल्ल्यात, पश्चिम महाराष्ट्रात आली. तिचा समारोप नुकताच झाला आहे. यातून पक्षात आलेली मरगळ झटकण्यास मदत झाली. तोंडावर आलेल्या निवडणुकांमधल्या संभाव्य उमेदवारांची चाचपणी ‘हल्लाबोल’च्या माध्यमातून झाली. इच्छुक उमेदवारांनी सभांमधून शक्तिप्रदर्शन केले. ‘राष्ट्रवादी’अंतर्गत नेतृत्वाची चुरस रंगल्याचेही दिसले. धनंजय मुंडेंनी यात अल्पावधीत आघाडी घेतली आहे. मुंडेंनी मुख्यमंत्र्यांपासून मोदींपर्यंत सर्वांना अंगावर घेतले. त्या तुलनेत काँग्रेस भलतीच निवांत आहे. प्रशिक्षण शिबिरांशिवाय दुसरा त्यांचा कार्यक्रम दिसत नाही. लढाईआधीच्या जमवाजमवीत सत्ताधारी आणि ‘राष्ट्रवादी’ पुढे चालल्याची जाग काँग्रेसला यायला हवी. हा निवांतपणा काँग्रेससाठी घातक ठरू शकतो. 

निवडणुकीसाठी जस जसा वेळ कमी होत जाईल तशा राजकीय हलचाली अधिक गतिमान होतील. युती-आघाडी न होता दुसरी समीकरणे उदयास येऊ शकतात कारण राजकारणात कधीच कोणी कोणाचा कायमचा शत्रू नसतो. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com