दिल्ली 'मनपा'मध्ये भाजपची सत्ता शक्‍य 

वृत्तसंस्था
सोमवार, 24 एप्रिल 2017

ऍक्‍सिस-इंडिया टुडेच्या मतदानोत्तर कल चाचणीत भाजपला 202-220, तर आपला 23 ते 35 जागा मिळण्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. या चाचणीत कॉंग्रेस 19 ते 31 जागांसह तिसऱ्या स्थानावर राहील, असे म्हटले आहे.

नवी दिल्ली - दिल्लीतील तीन महानगरपालिकांच्या 270 जागांसाठी आज झालेल्या मतदानानंतर वर्तविण्यात आलेल्या कल चाचणीत भाजपच्या शानदार विजयाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. आम आदमी पक्ष दुसऱ्या, तर कॉंग्रेस तिसऱ्या स्थानावर राहील, असेही विविध चाचण्यांमध्ये म्हटले आहे. 

ऍक्‍सिस-इंडिया टुडेच्या मतदानोत्तर कल चाचणीत भाजपला 202-220, तर आपला 23 ते 35 जागा मिळण्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. या चाचणीत कॉंग्रेस 19 ते 31 जागांसह तिसऱ्या स्थानावर राहील, असे म्हटले आहे. "एबीपी न्यू'च्या चाचणीतही भाजपला दक्षिण दिल्ली, उत्तर दिल्ली आणि पूर्व दिल्ली या तिन्ही महापालिकांमध्ये दोनशेपेक्षा अधिक जागा मिळण्याची शक्‍यता वर्तविण्यात आली आहे. या निवडणुकीची मतमोजणी 26 एप्रिल रोजी होणार आहे. 

दरम्यान, दिल्ली महापालिकांसाठी सायंकाळी 4 वाजता 45 टक्के मतदान झाले होते. 2012च्या निवडणुकीत 54 टक्के मतदान झाले होते. या वेळी यापेक्षा अधिक टक्के मतदान होईल, अशी आशा राज्य निवडणूक आयुक्त एस. के. श्रीवास्तव यांनी व्यक्त केली.