बृहन्मुंबई सर्वांत स्वच्छ राजधानी 

 Brihanmumbai is the cleanest capital city
Brihanmumbai is the cleanest capital city

नवी दिल्ली - केंद्र सरकारतर्फे घेण्यात आलेल्या स्वच्छ शहरांच्या सर्वेक्षण स्पर्धेत बृहन्मुंबई महापालिकेला देशातील सर्वांत स्वच्छ राजधानीच्या शहराचा मान मिळाला. नागपूर, परभणी व सासवडसह राज्यातील आठ शहरांनी विविध गटांत पारितोषिके पटकाविली. राष्ट्रीय पातळीवर हागणदारीमुक्ती व कचरा व्यवस्थापनात सर्वोत्कृष्ट ठरलेल्या राज्यांत महाराष्ट्राने झारखंड पाठोपाठ व छत्तीसगडला मागे टाकून दुसरा क्रमांक पटकाविला. राष्ट्रीय पातळीवरील अव्वल तीन स्वच्छ शहरांत इंदूर व भोपाळ या मध्य प्रदेशातील दोन शहरांनी पहिले दोन क्रमांक पटकाविले, तर चंडीगड तिसऱ्या क्रमांकावर आले. 

गोव्याची राजधानी पणजीलाही स्वच्छ राजधानी गटात पारितोषिक मिळाले आहे. लोकसभाध्यक्षा सुमित्रा महाजन यांच्या इंदूरने तर सलग दुसऱ्या वर्षी देशातील सर्वांत स्वच्छ महानगराचा मान मिळविला आहे. एक लाखापेक्षा कमी लोकसंख्येच्या शहरांत पश्‍चिम विभागांत अंकलेश्‍वर वगळता चारपैकी पाचगणी, सासवड व शेंदूरजनाघाट (जि. अमरावती) ही राज्यातील तीन शहरे विजेती ठरली आहेत. 

केंद्रीय नगरविकासमंत्री हरदीप पुरी यांनी आज स्वच्छ सर्वेक्षण-2018 स्पर्धेत विजेत्या ठरलेल्या 52 शहरांची नावे जाहीर केली. मंत्रालय सचिव दुर्गाशंकर मिश्रा, राजीवकुमार आदी उपस्थित होते. विजेत्या शहरांना दिल्लीत लवकरच पारितोषिके दिली जातील. इंदूरबरोबरच या तालिकेत गतवर्षीच्या 351 वरून 32 व्या स्थानावर झेप घेणाऱ्या गाझियाबादचेही पुरी यांनी कौतुक केले. 

दरम्यान, 2016 पासून सुरू झालेल्या स्वच्छ शहरे व महानगरांच्या या स्पर्धेत यंदा 4209 छोट्या मोठ्या शहरांनी सहभाग नोंदविला. दोन ऑक्‍टोबर 2019 पर्यंत संपूर्ण भारत स्वच्छ करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले असले, तरी याच वर्षी दोन ऑक्‍टोबरपर्यंत ते गाठण्याचे लक्ष्य केंद्राने राज्यांसमोर ठेवले आहे. 

 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com