यांना वेड लागले आहे.. हे वेडे झाले आहेत : राज्यसभेचे उपसभापती

KVP Ramchandra Rao
KVP Ramchandra Rao

नवी दिल्ली : आंध्र प्रदेशाला केंद्राने विशेष साहाय्य द्यावे या मागणीसाठी कॉंग्रेसचे के. व्ही. पी. रामचंद्र राव यांनी आज शून्य प्रहर व प्रश्‍नोत्तराच्या तासभर वेलमध्ये फलक धरून उभे राहत गांधीगिरी केली. त्यांना जागेवर बसण्यास वारंवार सांगूनही त्यांनी न ऐकल्याने संतप्त उपसभापती पी. जे. कुरियन यांनी, 'यांना वेड लागले आहे. हे वेडे झाले आहेत,' असे उद्विग्न उद्‌गार काढले.

'वेडा' हा शब्द असंसदीय आहे. राज्यघटनेनुसार मानसिक स्थिती बिघडलेली व्यक्ती संसद सदस्यपदी राहण्यास अपात्र ठरते, हा नियम लक्षात घेता पीठासीन अधिकाऱ्यांच्या स्पष्ट उल्लेखानंतर राव यांची सदस्यता आपोआप रद्द होते, त्यामुळे राव यांचे आजचे वर्तन चर्चेचा विषय ठरले आहे. 

प्रत्यक्ष राज्यसभा उपसभापतींनी 'राव हे वेडे झाले आहेत,' असा जाहीर उल्लेख केल्याने त्यांची सदस्यता कायम कशी राहणार, असा प्रश्‍न निर्माण झाला आहे. कारण घटनेच्या कलम 102 नुसार एखाद्याची मनोवस्था बिघडलेली असेल तर तो संसद सदस्य होण्यास अपात्र ठरतो. अर्थात, त्यासाठी न्यायालयाने संबंधिताच्या वेडसरपणाची खात्री पटवावी लागते असेही या कलमात म्हटले आहे.

काँग्रेसने कुरियन यांच्या उद्‌गारांबाबत नाराजी व्यक्त केल्यावर कुरियन यांनी मी कामकाजाचा वृत्तांत तपासेन व काही असंसदीय शब्द असल्यास कामकाजातून वगळण्यात येईल असे स्पष्ट केले.

अर्थसंकल्पात आंध्र प्रदेशाला काहीही न मिळाल्याने राव संतप्त झाले व 'आंध्र प्रदेशाला वाचवा,' असा फलक घेऊन वेलमध्ये दाखल झाले. कामकाजाच्या सुरवातीपासून त्यांनी फलक धरून अध्यक्षांच्या आसनासमोर घोषणा न देता उभे राहून संताप व्यक्त केला. दुपारी बाराला तर राव तासभर तसेच उभे होते व प्रश्‍नोत्तर तासही चालला होता असे दृश्‍य बघायला मिळाले. कुरियन यांनी राव यांना वारंवार जागेवर बसण्यास सांगितले, तरीही ते डोळे मिटून उभे होते. काँग्रेसचे जयराम रमेश, आनंद भास्कर रापुलू यांनी राव हे ज्येष्ठ नागरिक असल्याचे सांगताच कुरियन उसळून म्हणाले, ''मग तुम्ही येऊन त्यांना त्यांच्या जागेवर न्या. वारंवार सांगितले तरी ते पीठाचाही आदर करत नाहीत. हे टोकाचे बेशिस्त वर्तन आहे. यांना येथे पाठविल्याबद्दल लोकांना लाज वाटेल. ते पीठासीन अधिकाऱ्यांनाही जुमानत नाहीत. मी समजेन की ते माझे अंगरक्षक आहेत. सभागृहातील हे वर्तन संतापजनक आहे.'' 

'हिंदूने हिंदूला मारले' 
प्रश्‍नोत्तर तासात 'आप'च्या तीन नवख्या सदस्यांनी आपल्या पहिल्याच दिवशी दिल्लीतील सिलिंगविरोधात वेलमध्ये येऊन घोषणाबाजी केली व त्यांना तृणमूल कॉंग्रेस व कॉंग्रेसनेही पाठिंबा दिला. त्यापूर्वी सप सदस्यांनी उत्तर प्रदेशातील कासगंजचा हिंसाचार व त्याला सरकारी आशीर्वाद मिळत असल्याच्या मुद्द्यावरून शून्य प्रहरात गदारोळ केल्याने कामकाज तहकूब करावे लागले. सप नेते रामगोपाल यादव म्हणाले, की कासगंजमध्ये हिंदूनेच हिंदूला मारले व मुस्लिमांवर आळ आणला गेला. तेथे मुस्लिम समाजावर प्रचंड अत्याचार सुरू आहेत. या हिंसाचाराला सरकारचाही पाठिंबा आहे असाही दावा यादव यांनी केला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com