आता उच्च शिक्षणासाठीही प्रवेश परीक्षा; कॅबिनेटची मान्यता

वृत्तसंस्था
शनिवार, 11 नोव्हेंबर 2017

सध्या 40 लाखांहून अनेक विद्यार्थी कॅट, जेईई (मुख्य), जेईई(अॅडव्हान्स), गॅट, सीमॅट, नीट, नेट यांसारख्या प्रवेश परीक्षा देत आहेत. या सर्व परीक्षा सीबीएसई, आयआयटी, आयआयएम आणि एआयसीटीईच्या माध्यमातून दरवर्षी घेण्यात येतात.

नवी दिल्ली : अमेरिकेतील शैक्षणिक चाचणी सेवा (ईटीएस) च्या तत्त्वानुसार भारतातही उच्च शिक्षणासाठी प्रवेश परीक्षा घेण्यास केंद्रिय मंत्रिमंडळाने मान्यता दिली आहे. यासाठी राष्ट्रीय तपासणी एजन्सी (एनटीए) स्थापन करण्यात येणार आहे. 'एनटीए' ही संस्था सर्व प्रवेश परीक्षांचे नियोजन करणार असल्याची माहिती मिळत आहे. 

यातील सर्व प्रवेश प्रक्रिया या केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ, विद्यापीठ अनुदान आयोगाच्या राष्ट्रीय प्रवेश पात्रता परीक्षेच्या माध्यमातून घेण्यात येणार आहेत. याबाबत मनुष्यबळ विकास मंत्रालयाशी चर्चा करण्यात आली असून, येत्या आठ महिन्यात एनटीए स्थापन केली जाणार आहे. ही संस्था आयआयटी कानपूर किंवा आयआयटी दिल्ली येथे स्थापन केली जाणार असल्याचे सांगितले जात आहे. 

सध्या 40 लाखांहून अनेक विद्यार्थी कॅट, जेईई (मुख्य), जेईई(अॅडव्हान्स), गॅट, सीमॅट, नीट, नेट यांसारख्या प्रवेश परीक्षा देत आहेत. या सर्व परीक्षा सीबीएसई, आयआयटी, आयआयएम आणि एआयसीटीईच्या माध्यमातून दरवर्षी घेण्यात येतात.

एनटीए ही देशातील सर्वात मोठी परीक्षा घेणारी संस्था ठरावी, अशी कल्पना करण्यात येत आहे. त्यानुसार सध्या यावर कार्यवाही सुरु करण्यात आली आहे. त्यामुळे आयआयएम आणि आयआयटी या संस्था त्यांच्या परीक्षा कॅट आणि जेईई हस्तांतरीत करतात का, हे पाहणे गरजेचे आहे. यासाठी आवश्यक निर्णय घेण्यात आल्यानंतर एनटीए स्थापन करण्यात येणार असल्याची माहिती मनुष्यबळ विकास मंत्रालयातील वरिष्ट अधिकाऱ्याने दिली.

दरम्यान, ही संस्था एनटीए सोसायटी नोंदणी कायदा 1860, अंतर्गत स्थापन करण्यात येणार असून, परीक्षा ऑनलाईन पद्धतीने घेतली जाणार आहे. ही परीक्षा वर्षभरातून दोनदा घेण्यात येईल. या परीक्षेच्या माध्यमातून प्रत्येक उमेदवाराला त्याचे कर्तृत्व साध्य करण्यासाठी संधी देण्यात येणार आहे. ही एक स्वतंत्र, स्वायत्त, आत्मनिर्भर आणि आत्मनिर्धारित प्रीमियर चाचणी संस्था असणार आहे.