पंतप्रधान झाल्यावर प्रत्येकी 20 लाख देईन- आझम खान

वृत्तसंस्था
बुधवार, 19 ऑक्टोबर 2016

मी चहा बनवू शकतो, व्यवस्थित कपडे घालू शकतो, ड्रम वाजवू शकतो त्यामुळेच मी पंतप्रधान पदासाठी एकदम योग्य उमेदवार आहे. माझ्यात पंतप्रधानपदासाठी उपयुक्त सर्व गुण आहेत.

सहरानपूर - भारताचा पंतप्रधान म्हणून मी विराजमान झालो तर मी तुम्हाला आताच आश्वासन देतो की 130 कोटी भारतीय नागरिकांच्या बँक खात्यावर सहा महिन्यांत 20 लाख रुपये जमा करेल, असे वक्तव्य समाजवादी पक्षाचे (सप) नेते आझम खान यांनी केले आहे.

उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय धुळवडीला सुरवात झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभा निवडणुकीवेळी परदेशातून काळा पैसा आणून प्रत्येकाच्या बँक खात्यावर पंधरा लाख रुपये जमा करण्याचे आश्वासन दिले होते. याच मुद्द्यावरून आझम खान यांनी 20 लाख रुपये जमा करण्याचे आश्वासन दिले आहे. आझम खान यांनी यापूर्वीची पंतप्रधान होण्याची इच्छा व्यक्त केलेली आहे.

आझम खान म्हणाले, की मी चहा बनवू शकतो, व्यवस्थित कपडे घालू शकतो, ड्रम वाजवू शकतो त्यामुळेच मी पंतप्रधान पदासाठी एकदम योग्य उमेदवार आहे. माझ्यात पंतप्रधानपदासाठी उपयुक्त सर्व गुण आहेत. मी एवढा वाईट नसून, भ्रष्टाचारीही नाही.