राजधानी दिल्ली व्हेंटिलेटरवर 

पीटीआय
सोमवार, 7 नोव्हेंबर 2016

नवी दिल्ली - देशाची राजधानी दिल्लीतील वायुप्रदूषणाने मागील दोन दशकांतील सर्वोच्च पातळी गाठली असून, त्यामुळे तेथील जनजीवन विस्कळित झाले आहे. या समस्येचे गांभीर्य लक्षात घेऊन मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आज राज्य मंत्रिमंडळाची तातडीने बैठक बोलावत परिस्थितीचा आढावा घेतला. राज्यातील सर्व शाळा पुढील तीन दिवस बंद ठेवल्या जाणार असून, मोठ्या बांधकाम प्रकल्पांनाही ब्रेक लावण्यात आला आहे. 

नवी दिल्ली - देशाची राजधानी दिल्लीतील वायुप्रदूषणाने मागील दोन दशकांतील सर्वोच्च पातळी गाठली असून, त्यामुळे तेथील जनजीवन विस्कळित झाले आहे. या समस्येचे गांभीर्य लक्षात घेऊन मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आज राज्य मंत्रिमंडळाची तातडीने बैठक बोलावत परिस्थितीचा आढावा घेतला. राज्यातील सर्व शाळा पुढील तीन दिवस बंद ठेवल्या जाणार असून, मोठ्या बांधकाम प्रकल्पांनाही ब्रेक लावण्यात आला आहे. 

दिल्लीत कृत्रिम पाऊस पाडण्याचा राज्य सरकार गांभीर्याने विचार करत आहे. यासाठी केंद्र सरकारशी चर्चा करण्यात येईल, अशी माहिती सूत्रांनी दिली. रस्त्यांवरील वाहनांची रहदारी कमी करण्यासाठी पुन्हा सम-विषम प्रणालीचा वापर केला जाऊ शकतो. लोकांनी शक्‍य असेल तेथे घरातच काम करावे, अशी सूचनाही सरकारने केली आहे. 

बदरपूरमधील औष्णिक विद्युत प्रकल्प दहा दिवसांसाठी बंद केला जाणार असून, डिझेल जनरेटरच्या वापरावर देखील दहा दिवसांसाठी बंदी घालण्यात आली आहे. केजरीवालांनी आजच्या बैठकीत शेजारील राज्यांमध्ये शेतांत जाळल्या जाणाऱ्या पाचोट्याच्या समस्येचा उल्लेख केला. यामुळे सर्व राज्यांतील प्रदूषण वाढल्याचे त्यांनी म्हटले आहे. दरम्यान, याबाबत केंद्रीय पर्यावरणमंत्री अनिल दवे यांनी प्रदूषणासाठी अन्य राज्यांवर आरोप करणे हा केवळ राजकारणाचा भाग असून त्यांचा प्रदूषणातील वाटा केवळ 20 टक्के एवढा असल्याचे सांगत, राजधानीतील 80 टक्के प्रदूषण हे केवळ कचऱ्यामुळे होते, असे म्हटले आहे. 

या प्रदूषणाच्या समस्येमुळे जनक्षोभ वाढत चालला असून, आज शेकडो नागरिकांनी जंतरमंतरवर सरकारविरोधात निदर्शने केली. दाट धुक्‍यामुळे आज दिल्लीतील क्रिकेटचे दोन रणजी सामने देखील रद्द करण्यात आले. डोळे चुरचुरू लागल्याने खेळाडूंनीच सामना रद्द करण्याचा आग्रह धरला होता. 

स्थिती आणखी बिकट होणार 

आज सकाळी साडेआठच्या सुमारास दिल्लीतील दृश्‍यमानता दोनशे मीटरवर आली होती. ही परिस्थिती नियंत्रणात आणली नाही, तर आणखी बिकट होऊ शकते, असे हवामान खात्याच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. हवेतील घातक "पीएफपीएम 2.5' सूक्ष्म कणांचे प्रमाण प्रति क्‍युबिक मीटर सातशे मायक्रोग्रॅम्सवर पोचले आहे. या कणांचा विपरीत परिणाम थेट मानवी फुफ्फुस आणि हृदयावर होतो. सरकारने निर्धारित केलेल्या मर्यादेपेक्षा या कणांचे हवेतील प्रमाण बारापटींनी अधिक असून, जागतिक आरोग्य संघटनेच्या मानकांचा विचार केला, तर 70 टक्‍क्‍यांपेक्षाही अधिक भरते. 

रेस्टॉरंटवर ठपका 

वायू आणि जल प्रदूषणासाठी कारणीभूत ठरलेल्या पूर्व दिल्लीतील एका रेस्टॉरंटला टाळे ठोकण्याचे निर्देश राष्ट्रीय हरित लवादाने पूर्व दिल्ली महानगरपालिकेस दिले आहेत. लवादाचे प्रमुख न्या. स्वतंत्रकुमार यांनी याबाबत महापालिकेस उत्तर देण्याचे आदेश दिले असून, संबंधित अधिकाऱ्याने 10 नोव्हेंबर रोजी होणाऱ्या सुनावणीस उपस्थित राहावे, असेही लवादाने आपल्या आदेशात म्हटले आहे. काही स्थानिक नागरिकांनीच याविरोधात लवादाकडे धाव घेतली होती. 

दिवसभरात 

दिल्लीत मास्कच्या विक्रीत मोठी वाढ 

दमा, संसर्गजन्य आजारांचे रुग्ण वाढले 

संसदीय समितीही उपाययोजनांवर असमाधानी 

"सीआयएसएफ'च्या जवानांना मास्कचा पुरवठा 

दिल्लीतील एक श्‍वास 40 सिगारेटबरोबर 

वृद्ध, बालके आणि रुग्णांना प्रदूषणाचा त्रास

Web Title: The capital Delhi on ventilators