कास्टिंग काऊच'मधून खासदारही सुटल्या नाहीतः रेणुका चौधरी

Renuka Chowdhury
Renuka Chowdhury

नवी दिल्ली: 'प्रत्येक ठिकाणी कास्टिंग काऊच होते आणि संसदही त्यापासून सुटलेली नाही,' असे सांगून माजी केंद्रीय मंत्री, राज्यसभेतील खासदार रेणुका चौधरी यांनी खळबळ उडवून दिली आहे. कास्टिंग काऊचबाबत बॉलिवूड कोरिओग्राफर सरोज खान यांनी केलेल्या वक्तव्यावरुन वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत असतानाच काँग्रेस नेत्या चौधरी यांनीही प्रतिक्रिया दिली आहे.

सरोज खान यांचे समर्थन करताना चौधरी यांनी हे धक्कादायक विधान केले. 'कास्टिंग काऊचची समस्या केवळ बॉलिवूडपर्यंत मर्यादित नाही. प्रत्येक ठिकाणी कास्टिंग काऊच होत असते. हे सत्य आहे. संसद आणि इतर काही कामाची ठिकाणे यापासून सुटलीत, असे काही समजू नका,' असं सांगतानाच 'मी-टू' म्हणत आवाज उठविण्याची हीच वेळ आहे. प्रत्येकाने त्यावर बोलले पाहिजे. आपण भारतीय आता बिनधास्तपणे पुढे येत असून, आपल्याबाबत काय घडलं हे सांगत आहोत,' असेही त्यांनी स्पष्ट केले. दरम्यान, चौधरी यांच्या या धक्कादायक विधानामुळे एकच खळबळ उडाली आहे.

एका संकेतस्थळाला दिलेल्या मुलाखतीत सरोज खान यांनी बॉलिवूडमधील कास्टिंग काऊचं समर्थन करणारं धक्कादायक विधान केले होते. 'हे प्रकार बाबा आदमच्या जमान्यापासून सुरू आहेत. प्रत्येक मुलीवर कोणी ना कोणी हात साफ करतोच. सरकार आणि सरकारचे लोकही मुलींचे शोषण करतात, मग बॉलिवूडवरच टीका का केली जाते? बॉलिवूड पीडितेला कमीत कमी रोजी-रोटी तरी देते. बलात्कार करून सोडून देत नाही. शेवटी काय करायचं आणि काय नाही, हे सर्व त्या मुलीवर अवलंबून असतं. तुमच्याकडे कला असेल तर तुम्हाला बॉलिवूडशी तडजोड करण्याची गरज नाही,' असे सरोज खान म्हणाल्या होत्या.

'चित्रपट सृष्टीत कोणत्याही मुलीवर बलात्कार करुन सोडून देत नाही, तर त्यांना काम आणि रोटी पण देते,' असे म्हणत सरोज खान यांनी एकप्रकारे कास्टिंग काऊचचं समर्थन केले होते. परंतु, त्यानंतर त्यांनी माफीही मागितली होती.

दक्षिण भारतातील स्ट्रगलर अभिनेत्री श्री रेड्डीच्या आरोपांनंतर भारताच्या फिल्म इंडस्ट्रीमधील कास्टिंग काऊचवर जोरदार चर्चा रंगली आहे. त्यानंतर बॉलिवूडच्या काही अभिनेत्रींनीही त्यांच्यासोबत कास्टिंग काऊच झाल्याचे सांगितले. तेलुगू चित्रपटसृष्टीमध्ये करिअर करण्याच्या प्रयत्नात असलेली अभिनेत्री श्री रेड्डीने अर्धनग्न अवस्थेत आंदोलन करत चित्रपटसृष्टीतील 'कास्टिंग काऊच सत्य समोर आणलं. या अभिनेत्रीने आंदोलनाद्वारे तेलुगू फिल्म इंड्रस्टीमधील कास्टिंग काऊचच्या मुद्द्याला वाचा फोडली होती. त्यानंतर फिल्म इंडस्ट्रीमधील कास्टिंग काऊचबद्दल चर्चा सुरु झाली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News
www.esakal.com