वाढीव गुणांची खिरापत आता बंद

सकाळ न्यूज नेटवर्क
बुधवार, 26 एप्रिल 2017

विद्यार्थ्यांचे वाढवण्याच्या या शर्यतीमुळे अलीकडे शिक्षणात "गुण फुगवटा' असा प्रकार वाढला आहे.
- प्रकाश जावडेकर, केंद्रीय शिक्षण मंत्री

नवी दिल्ली - शालेय व महाविद्यालयीन शिक्षणातील गुणवत्ता वाढीसाठी वाढीव गुणांची (ग्रेस मार्क) खिरापत बंद करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (सीबीएसई) घेतला आहे. वाढीव गुण दिले तर त्याची कारणेही गुणपत्रिकेवरच लेखी नमूद करण्याबाबत राज्यांच्या शिक्षण मंडळांनी अनुकूल भूमिका घेतली आहे.

विद्यार्थ्यांचे गुण वाढवत नेण्याच्या या शर्यतीमुळे अलीकडे महाविद्यालयीन प्रवेशासाठी 100 टक्केही अपुरे पडत असल्याचे चित्र पालटवण्यासाठी हा निर्णय घेतला गेला आहे. मनुष्यबळ विकास मंत्रालयाने घेतलेल्या बैठकीत राज्यांच्या शिक्षण मंडळांनीही वाढीव गुणपद्धती बंद करण्याबाबत एकमुखाने अनुकूल मत व्यक्त केले.

राज्यांच्या शिक्षण सचिवांची व शिक्षण मंडळ पदाधिकाऱ्यांची बैठक दिल्लीत झाली. तीत गुण वाढविण्याची शर्यतच राज्याराज्यांत लागल्याचे मत व्यक्त झाले. मार्कांची नव्वदी सहज ओलांडणाऱ्या अनेक विद्यार्थ्यांबाबतही शक्षणिक गुणवत्तेच्या दृष्टीने प्रश्‍नचिन्हही समोर येते. हे प्रकार थांबण्यासाठी राज्यांनीच अनुकूलता दाखविली हे सकारात्मक पाऊल असल्याचे शिक्षणमंत्री प्रकाश जावडेकर यांनी "सकाळ'ला सांगितले. ते म्हणाले, की विद्यार्थ्यांचे वाढवण्याच्या या शर्यतीमुळे अलीकडे शिक्षणात "गुण-फुगवटा' (इन्फ्लेशन ऑफ मार्कस्‌) असा प्रकार वाढला आहे. मंत्री म्हणून याला आळा घालण्यासाठी आपण दिल्लीत ही राज्यांची बैठक बोलावली होती. "सीबीएसई'ने वाढीव गुणपद्धती बंद करण्याचा निर्णय तातडीने घेतला आहे. ही पद्धत एकदम बंद करणे शक्‍य नसले तरी वाढीव गुणांची कारणे गुणपत्रिकेवरच नमूद करणे बंधनकारक करण्यास राज्यांनी या बैठकीत अनुकूलता दाखविली.

जावडेकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत वस्तुनिष्ठ गुण देण्याबाबत आग्रही भूमिका घेण्यात आली. जास्तीत जास्त नव्हे तर सुयोग्य व गुणवत्तेनुसार गुण देण्याची पद्धत अवलंबण्याच्या सूचनेला राज्यांनी अनुकूल प्रतिसाद दिला. वाढीव गुण ही सूचना असते तो नियम बनणे शिक्षण गुणवत्तेच्या दृष्टीने इष्ट नाही, असे मत केंद्राने या बैठकीत मांडले.

विद्यार्थ्यांचे वाढवण्याच्या या शर्यतीमुळे अलीकडे शिक्षणात "गुण फुगवटा' असा प्रकार वाढला आहे.
- प्रकाश जावडेकर, केंद्रीय शिक्षण मंत्री