ईव्हीएम हॅक करुन दाखवाच; आयोगाचे खुले आव्हान

वृत्तसंस्था
शनिवार, 20 मे 2017

भारतात निवडणुकीत वापरण्यात येणाऱ्या ईव्हीएम परदेशातील नाहीत. तसा गैरसमज पसरविण्यात येतो. भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड आणि इलेक्ट्रॉनिक्स कार्पोरेशन ऑफ इंडिया या दोन भारतीय कंपन्या ईव्हीएम तयार करतात. ईव्हीएमसोबत कोणी छेडछाड करण्याचा प्रयत्न केल्यास ते बंद होते.

नवी दिल्ली - ईव्हीएम मशीन हॅक होऊच शकत नाही. ईव्हीएमबाबतच्या आफवा चुकीच्या आहेत. आमचे सर्व राष्ट्रीय व प्रादेशिक राजकीय पक्षांना आव्हान आहे, की त्यांनी 3 जूनपासून ईव्हीएम हॅक करून दाखवावेच, असे खुले आव्हान मुख्य निवडणूक आयुक्त डॉ. नसीम झैदी यांनी आज (शनिवार) दिले.

नुकत्याच झालेल्या पाच राज्यांच्या निवडणुकांनंतर ईव्हीएम प्रश्न उपस्थित करण्यात आले होते. तर, आम आदमी पक्षाने ईव्हीएम कशाप्रकारे हॅक करता येऊ शकते, याबाबतची माहिती दिली होती. त्यामुळे प्रश्न उपस्थित होत असलेल्या निवडणूक आयोगाने आज यावर पत्रकार परिषद घेत ईव्हीएम हॅक होऊच शकत नाही, असा दावा केला आहे.

(या संदर्भातील यापूर्वीची बातमी वाचा केजरीवाल, आमची 'इव्हीएम' हॅक करून दाखवाच!)

नसीम झैदी म्हणाले, की आमचे सर्व राजकीय पक्षांना आव्हान आहे हॅकींगसंदर्भात त्यांनी आपल्या तीन सदस्यांची नावे आयोगाकडे 26 मे सायंकाळी पाच वाजेपर्यंत पाठवावीत. ईव्हीएम हे कोणत्याही नेटवर्कशी कनेक्ट नसल्याने, हॅक करणे अशक्य आहे. ईव्हीएम बनवितानाही त्याच्यासोबत छेडछाड करणे शक्य नाही. ईव्हीएममधील इंटर्नल सर्कीट बदलता येऊ शकत नाही. या आव्हानामुळे आम्ही मतदारांमध्ये आणखी विश्वास निर्माण करू. आमची इच्छा आहे, की देशातील नागरिक निवडणूक प्रणालीसोबत आणखी जोडले जावेत. निवडणूक आयोगाने कायम पारदर्शीपणे आपले काम केले आहे. राजकीय पक्षांना परवानगी असेल, की विधानसभा क्षेत्रातील कोणत्याही चार बूथवरील मशीनची चौकशी करावी. परदेशात वापरण्यात येणाऱ्या ईव्हीएमपेक्षा आपल्या ईव्हीएम चांगल्या गुणवत्तेच्या सिद्ध झाल्या आहेत. 

भारतात निवडणुकीत वापरण्यात येणाऱ्या ईव्हीएम परदेशातील नाहीत. तसा गैरसमज पसरविण्यात येतो. भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड आणि इलेक्ट्रॉनिक्स कार्पोरेशन ऑफ इंडिया या दोन भारतीय कंपन्या ईव्हीएम तयार करतात. ईव्हीएमसोबत कोणी छेडछाड करण्याचा प्रयत्न केल्यास ते बंद होते. आता मतदान केल्याची पावती मतदारांना मिळणार असल्याने मतदारांमध्ये विश्वास अधिक मजबूत होईल, सगळ्या शंका दूर होतील, असे झैदी यांनी म्हटले आहे.