हनीप्रीतविरोधात "लूकआउट' नोटीस

वृत्तसंस्था
शनिवार, 2 सप्टेंबर 2017

"डेरा'प्रमुखास पळविण्याचा कट आखल्याचा आरोप

चंडीगड : सध्या तुरुंगात असलेला "डेरा सच्चा सौदा'चा प्रमुख आणि कथित आध्यात्मिक गुरू गुरमीत रामरहीम सिंग याची दत्तक कन्या हनीप्रीत इन्सान आणि डेराचा कारभारी आदित्य इन्सानविरोधात हरियाना पोलिसांनी आज लूकआउट नोटीस बजावली असल्याचे पंचकुलाचे पोलिस आयुक्त ए. एस. चावला यांनी सांगितले. हनीप्रीतविरोधात देशद्रोहाचा गुन्हाही नोंदविण्यात आल्याचे समजते. हनीप्रीतचा शोध घेत पोलिसांचे पथक नेपाळ बॉर्डरपर्यंत पोचल्याचा दावा एका हिंदी वृत्तवाहिनीने केला आहे.

बलात्कारप्रकरणी विशेष सीबीआय न्यायालयाने गुरमीत रामरहीम सिंगला दोषी ठरविल्यानंतर त्याला न्यायालयाच्या आवारातून पळवून नेण्याचा कट हनीप्रीतने आखला होता; पण पोलिस आणि लष्कराच्या अधिकाऱ्यांनी तो निष्फळ ठरविला, अशी माहिती सूत्रांनी दिली. आदित्य इन्सानविरोधातही देशद्रोहाचा गुन्हा नोंदविण्यात आल्याचे समजते. पोलिसांनी बजावलेली लूकआउट नोटीस उद्या (ता. 2) सार्वजनिक केली जाणार आहे. हनीप्रीतने देशाबाहेर पलायन करू नये म्हणून विमानतळे, रेल्वेस्थानके आणि बसस्थानकांनाही सावधगिरीचा इशारा देण्यात आला आहे. गुरमीतला न्यायालयाने दोषी ठरविल्यानंतर हरियाना, पंजाबमध्ये मोठा हिंसाचार उसळला होता. या हिंसाचारामध्ये 38 जण ठार झाले होते, तर अडीचशे जण जखमी झाले होते.

रोहतकमध्ये वास्तव्य
न्यायालयाने गुरमीतला शिक्षा ठोठावल्यानंतर हनीप्रीत फरार झाली होती. तुरुंगाच्या परिसरातून बाहेर पडल्यानंतर ती रोहतकच्या आर्यनगरमधील संजय चावला नामक एका डेराप्रेमीच्या घरी वास्तव्यास होती. त्यानंतर ती नेमकी कोठे गायब झाली, हे कोणालाच माहीत नाही. गुरमीतचे हनीप्रीतसोबतही संबंध होते, असा आरोप तिचा पती विश्‍वास गुप्ताने केला होता.

"डेरा'प्रमुखाची छाया
हनीप्रीत बाबा रामरहीमसोबत सावलीसारखी वावरत होती, डेऱ्यातील अनेक महत्त्वपूर्ण निर्णय तिच्याच पुढाकाराने घेतले जात असत. गुरमीत रामरहीम सिंग याच्या अनेक चित्रपटांचे दिग्दर्शन तिनेच केले होते. गुरमीतला न्यायालयाने दोषी ठरविल्यानंतर न्यायालयातून तुरुंगापर्यंतच्या प्रवासामध्ये हनीप्रीतच त्याच्यासोबत होती.