नोबेल विजेत्यांना 100 कोटींचे पारितोषिक: नायडू

वृत्तसंस्था
गुरुवार, 5 जानेवारी 2017

तिरुपती : आंध्रप्रदेशमधील कोणत्याही व्यक्तीला जर नोबेल पुरस्कार प्राप्त झाला तर त्या व्यक्तीला 100 कोटी रुपयांचे पारितोषिक देण्यात येईल, अशी घोषणा आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी केली आहे.

तिरुपती : आंध्रप्रदेशमधील कोणत्याही व्यक्तीला जर नोबेल पुरस्कार प्राप्त झाला तर त्या व्यक्तीला 100 कोटी रुपयांचे पारितोषिक देण्यात येईल, अशी घोषणा आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी केली आहे.

श्रीपद्मावती महिला विद्यापीठात आयोजित करण्यात आलेल्या नॅशनल चिल्ड्रन सायन्स काँग्रेसच्या कार्यक्रमात नायडू बोलत होते. "राज्यातील कोणत्याही वैज्ञानिकाला किंवा इतर क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तीला जर नोबेल पुरस्कार प्राप्त झाला, तर त्याला सरकारकडून 100 कोटी रुपयांचे पारितोषिक देण्यात येईल', अशी घोषणा नायडू यांनी केली. विद्यार्थ्यांना संबोधित करताना त्यांनी आयुष्यात मेहनत करण्याचा सल्ला दिला. छोट्या छोट्या कल्पनांमधून मोठमोठे संशोधने होत असतात, असेही ते पुढे म्हणाले. राज्याचे विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रीही यावेळी उपस्थित होते.

भारतीय रुपयांमध्ये नोबेल पुरस्काराची रक्कम ही जवळपास 5.96 कोटी रुपये आहे. त्यामुळे नायडू यांनी घोषित केलेली पारितोषिकाची रक्कम ही जवळपास 17 पट अधिक आहे. एका वृत्तानुसार यापूर्वीही नायडू यांनी राज्यातील संशोधक, वैज्ञानिकांना प्रोत्साहन देण्यासाठी नोबेल पुरस्कार जिंकणाऱ्या व्यक्तीला 10 कोटी रुपये पारितोषिक देण्याचे घोषित केले होते. यावेळी घोषणा करताना त्यांनी पारितोषिकाच्या रकमेत वाढ केली आहे.