जवान चंदू चव्हाण यांच्या पाठीशी राहूया...!!

जवान चंदू चव्हाण यांच्या पाठीशी राहूया...!!

भारतीय सीमेवरील पूंछ सेक्‍टरमध्ये कर्तव्यावर असलेले जवान चंदू बाबूलाल चव्हाण (वय 23, रा. बोरविहीर, धुळे) 28 सप्टेंबर 2016 रोजी नियंत्रण रेषा ओलांडून चुकून पाकिस्तानच्या सीमेत गेले अन् पाकिस्तानच्या सैनिकांनी त्यांना ताब्यात घेतले. पाकिस्तानी लष्कराच्या ट्विटरवरून चंदू चव्हाण यांना ताब्यात घेतल्याची माहिती प्रसिद्धही केली गेली. पाकिस्तानी लष्कराने त्यांना अज्ञातवासात ठेवल्याची माहिती तेथील प्रसारमाध्यमांनी दिली. मात्र, पुढे पाकिस्तान यू-टर्न घेत चंदू चव्हाण आमच्या ताब्यात नसल्याचे सांगत आहे.

चंदू चव्हाण हे लहान असतानाच यांच्या आई- वडिलांचे निधन झाले आहे. त्यांना एक भाऊ व विवाहीत बहीण आहे. तिघा भावंडांचा त्यांच्या आजी-आजोबांनी (आईचे आई-वडिल) सांभाळ केला आहे. चंदू चव्हाण यांचा भाऊसुद्धा लष्करात आहेत. चंदू चव्हाण यांना पाकिस्तानने पकडल्याची माहिती त्यांच्या घरी समजली. नातू पकडला गेल्याचा धक्का सहन न झाल्याने त्यांच्या आजी लीलाबाई चिंधा पाटील (चव्हाण) यांचे निधन झाले. या संपूर्ण घटना-घडामोडींनी त्या कुटुंबावर डोंगर कोसळला आहे. चंदू जोपर्यंत भारतात परतत नाही तोपर्यंत आजीच्या अस्थिचे विसर्जन न करण्याचा निर्णय नातेवाईकांनी घेतला आहे.

या पार्श्‍वभूमीवर संरक्षण राज्यमंत्री तथा धुळ्याचे खासदार डॉ. भामरे यांनी चंदू यांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन उच्चस्तरीय पातळीवर प्रयत्न सुरू असल्याचे सांगितले. संरक्षणमंत्री मनोहर पर्रिकर यांनीही चंदू लवकरच भारतात परततील, असे सांगितले आहे. चंदू यांना परत आणण्यासाठी सरकारने कंबर कसली असून, त्यांच्या सुटकेबाबच्या प्रयत्नांची ग्वाही केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह आणि गृहराज्यमंत्री हंसराज अहिर यांनी दिली आहे. परंतु, चंदू चव्हाण आमच्या ताब्यात नसल्याचे पाकिस्तान सांगत आहे. त्यामुळे चंदू भारतात कधी अन् केव्हा परततील याबाबत संभ्रम आहे.

सीमेवर दक्ष असलेल्या सैनिकांमुळेच देशातील नागरिक निवांत दैनंदिन व्यवहार करू शकतात. कुटुंबापासून दूर असलेले व आपले कर्तव्य चोख पार पाडणारे जवान हेच खरे देशाचे हिरो आहेत. परंतु, लष्करात कोणी जायला सांगितले, असे अभिनेते ओम पुरी जेव्हा म्हणतात ना तेव्हा सर्वसामान्य नागरिकांच्या मनात चीड निर्माण होते. असो...अनेकजण वादग्रस्त विधाने करून प्रसिद्धीच्या झोतात येण्याचा प्रयत्न करतात. मुळ मुद्दा आहे की चंदू चव्हाण हे भारतात केव्हा परततील...

चंदू चव्हाण यांना पकडल्यानंतर अनेक पाकिस्तानी नेटिझन्सनी पाकिस्तानमधील वृत्तपत्रांच्या ऑनलाइन संकेतस्थळांवर प्रतिक्रिया नोंदविल्या आहेत. चंदू चव्हाण यांची पाकिस्तान सरकारने लवकरात लवकर सुटका करावी, असे मत अनेकांनी नोंदविले आहे. आपल्या सैनिकांप्रमाणेच ते एक आहेत. भारत-पाकिस्तानचा प्रश्न राजकीय नेत्यांनी बैठकीत सोडवावा. परंतु, जवानाला भारताच्या ताब्यात सुपूर्त करण्यात यावे, अशाही प्रतिक्रिया वाचायला मिळतात.

जालंधरमध्ये तहानेने व्याकूळ होऊन नकळतपणे तन्वीर (वय 12) पाकिस्तानमधील मुलगा भारतीय हद्दीत दाखल झाला होता. जवानांनी तन्वीरला रात्री आपल्यासोबत ठेवून घेत त्याची काळजी घेतली. भारतीय जवानांनी पाकिस्तानकडे सोपवून आपल्यातील माणुसकीचे दर्शन घडविले. गेल्या काही दिवसांपासून भारत-पाकिस्तानमधील संबंध ताणले गेले असले तरी तन्वीरला पाकिस्तानकडे सोपवून आपल्यातील माणुसकी अद्याप जीवंत असल्याचा प्रचिती भारतीय सैनिकांनी सर्वांना दिली. याच धर्तीवर नजरचुकीने सीमा ओलांडलेल्या भारतीय जवान चंदू चव्हाण यांना सोडण्याचे औदार्य पाकिस्तान दाखविणार का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

चंदू चव्हाण यांच्या कुटुंबाच्या पाठीशी आपण राहूया...त्यांना लवकरात लवकर भारतात परतण्यासाठी शुभेच्छा देऊया...सर्वसामान्य नागरिक म्हणून आपण सध्यातरी तेवढेच करू शकतो. प्रतिक्रियांच्या माध्यमातून दिलेल्या आपल्या शुभेच्छा नक्कीच त्यांच्यापर्यंत पोचतील अन् ते भारतात परततील, अशी अपेक्षा बाळगूया.

जय हिंद!!!!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com