दुहेरी किंमत धोरण साखरेसाठी आणावे

सकाळ न्यूज नेटवर्क
शनिवार, 20 मे 2017

वीजक्षेत्रात दुहेरी किंमत धोरण यशस्वीपणे अमलात आणले जाते. घरगुती वापराच्या आणि उद्योग- व्यवसायासाठीच्या वीजवापराचे दर वेगवेगळे असतात याकडे निवेदनात लक्ष वेधण्यात आले आहे. त्या धर्तीवरच घरगुती साखर ग्राहकांना 30 रुपये किलोने, तर उद्योग- व्यायसायिकांना 50 ते 60 रुपये किलो दराने साखर उपलब्ध करून देणे हा एक उत्कृष्ट तोडगा होऊ शकेल

नवी दिल्ली - साखरेसाठी "दुहेरी किंमत धोरण' लागू करण्याची जोरदार मागणी व शिफारस राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाने केली आहे.

उद्योग- व्यावसायिकांसाठी 50-60 रुपये व सामान्य (घरगुती) ग्राहकांसाठी 30 रुपये प्रतिकिलो दराचा प्रस्तावही महासंघाने केला आहे. यामुळे ऊस उत्पादक, साखर कारखाने आणि ग्राहक या तिन्ही घटकांना लाभ होईल, असा दावा करण्यात आला. महासंघाचे प्रतिनिधी लवकरच याबाबत सरकारबरोबर चर्चा करणार आहेत.
महासंघाचे व्यवस्थापकीय संचालक प्रकाश नाइकनवरे यांनी या संदर्भात आज येथे केलेल्या एका निवेदनात साखर उद्योगाला संकटमुक्त करण्यासाठी चाकोरीबाह्य उपाययोजनांची आवश्‍यकता असून "दुहेरी किंमत धोरण' हा एक उपाय असू शकतो व यासाठी ऊस उत्पादक, साखर कारखाने, साखरेचे ग्राहक, बॅंका, सरकार यांनी एकत्रित विचार करून तोडगा काढण्याची व साखर उद्योगाला संकटमुक्त करण्याची नितांत गरज असल्याचे म्हटले आहे.

वीजक्षेत्रात दुहेरी किंमत धोरण यशस्वीपणे अमलात आणले जाते. घरगुती वापराच्या आणि उद्योग- व्यवसायासाठीच्या वीजवापराचे दर वेगवेगळे असतात याकडे निवेदनात लक्ष वेधण्यात आले आहे. त्या धर्तीवरच घरगुती साखर ग्राहकांना 30 रुपये किलोने, तर उद्योग- व्यायसायिकांना 50 ते 60 रुपये किलो दराने साखर उपलब्ध करून देणे हा एक उत्कृष्ट तोडगा होऊ शकेल. यामुळे सर्वसामान्य ग्राहकांना रास्त व स्वस्त दरात साखर मिळेल. ऊस उत्पादकांना किफायतशीर भाव देता येणे शक्‍य होईल आणि साखर कारखाने आर्थिकदृष्ट्या अधिक मजबूत व सक्षम होतील, असे त्यांचे म्हणणे आहे.

जगभरात एक "साखरविरोधी लॉबी' सक्रिय असल्याचा आरोप करून नाईकनवरे म्हणाले, ""लठ्ठपणा, मधुमेह आणि हृदयरोग यासाठी साखर कारणीभूत असल्याचा प्रचार केला जातो. यामुळे अनेक विकसित देशांनी साखरेच्या खपावर आणि खाण्यावर नियंत्रण आणण्यासाठी "साखरकर' लादून किमती कृत्रिमरीत्या वाढविण्याचा प्रयोगही सुरू केला. पेप्सी, कोक या शीतपेय कंपन्यांनी साखरेऐवजी "स्टेव्हिया' हा कृत्रिम गोड पदार्थ वापरण्यास सुरवात केली आहे. असे असले तरी जगभरात साखरेच्या खपात सातत्याने वाढ नोंदली जात आहे. भारतातच 2020पर्यंत वार्षिक 300 लाख टन साखरेचा खप अपेक्षित आहे. यातील 70 टक्के खप हा प्रामुख्याने गोड पदार्थ, बेकरी उत्पादने, मिठाई, बिस्किटे यासाठी होतो. घरगुती साखर वापराचे प्रमाण केवळ 30 टक्के आहे.''

साखरेचा दर 19-20 रुपयांपर्यंत खाली आला होता; पण तेव्हा मिठाई, बेकरी उत्पादक, बिस्किटे या उद्योगांनी त्यांच्या मालाचे भाव अजिबात कमी न करता 10 ते 14 महिन्यांच्या कालावधीत अफाट नफा कमावला होता, याकडेही नाईकनवरे यांनी लक्ष वेधले व त्या वेळी या नफेखोरीबाबत कोणी विचारणा केली नव्हती, याबद्दल खेद व्यक्त केला.

देश

चंडीगड: डेरा सच्चा सौदाचा प्रमुख राम रहीम याला शिक्षा सुनावल्यानंतर हरियानात हिंसाचार घडवून आणल्याप्रकरणी हनीप्रीत इन्सानविरुद्ध...

मंगळवार, 19 सप्टेंबर 2017

हैदराबाद: वैद्यकीय पदवी अभ्यासक्रम (एमबीबीएस) प्रवेशास पात्र न ठरल्याने पतीने पत्नीला जाळल्याची घटना येथे नुकतीच घडली. याप्रकरणी...

मंगळवार, 19 सप्टेंबर 2017

देवरिया (उत्तर प्रदेश) : उत्तर प्रदेशातील देवरिया शहरात पंधरा वर्षे वयाच्या विद्यार्थीनीचा शाळेच्या तिसऱया मजल्यावरून पडून मृत्यू...

मंगळवार, 19 सप्टेंबर 2017